नाशिक येथे ‘अखिल भारतीय संत समिती’ची बैठक पार पडली !

नाशिक – ‘सिंहस्थ कुंभपर्व २०२७’च्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे ‘अखिल भारतीय संत समिती’ची २ दिवसांची बैठक नुकतीच पार पडली. १३ आखाड्यांच्या प्रतिनिधींसमवेत २६ राज्यांतील विविध संप्रदायांचे २३८ संत यात सहभागी झाले होते. विविध धार्मिक संघटनांचे प्रतिनिधीही यात सहभागी झाले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ‘अखिल भारतीय संत समिती’चे अध्यक्ष जगद्गुरु अविचल देवाचार्य हे होते.

या बैठकीत देशभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभपर्वाची सिद्धता, राष्ट्रीय एकता आणि अखंडता, धर्मांतर अन् घरवापसी (धर्मांतर झालेल्यांनी स्वधर्मात परत येणे), जनगणनेमध्ये हिंदुहिताचे संरक्षण, मठ-मंदिरांचे सरकारीकरण थांबवणे, तीर्थक्षेत्रांचे संरक्षण, धार्मिक क्षेत्रातील पाखंडी लोक आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

कुंभपर्वमंत्री गिरीश महाजन यांनी संतांच्या मागण्या नोंदवून घेतल्या आणि सहकार्याची ग्वाही दिली. या वेळी कुंभपर्व आयुक्त शेखर सिंह यांनी कुंभपर्वाच्या सिद्धतेचा सविस्तर आढावा संतांना सादर केला.

या बैठकीत दुसर्‍या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी विधेयक संमत केल्याविषयी या वेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.
श्रीकृष्ण जन्मभूमी आणि काशी-ज्ञानवापी न्यायालयीन प्रकरणी तोडगा काढण्याच्या सूत्रावर या बैठकीत संतांनी भर दिला. राष्ट्रविरोधी हिंदु शक्तींविषयी चिंता व्यक्त करत घरवापसी करणार्‍यांना सर्वतोपरी साहाय्य करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. ‘जनगणना २०२७’ मध्ये सर्व हिंदूंनी त्यांचा धर्म ‘हिंदु’ नोंदवावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले. राष्ट्रीय स्तरावर गोवंश हत्याबंदी कायदा करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. देशातील २०० जिल्ह्यांत घटणार्‍या हिंदूंच्या संख्येविषयीही या वेळी चिंता व्यक्त करण्यात आली. या भागात संतांना सक्रीय होण्याचे आवाहन करण्यात आले.

सिंहस्थ कुंभपर्वासाठी आरोग्ययंत्रणा सज्ज ठेवा ! – प्रकाश आबिटकर, आरोग्यमंत्री

प्रकाश आबिटकर

मुंबई – त्र्यंबकेश्वर येथे होणार्‍या सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना आरोग्यसेवा देण्यास आरोग्ययंत्रणा पूर्णतः सज्ज ठेवा, असे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आबिटकर यांनी ८ एप्रिल या दिवशी मंत्रालयात आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला नाशिक परिमंडळातील आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रकाश आबिटकर पुढे म्हणाले, ‘‘सिंहस्थ कुंभपर्वाच्या निमित्त नाशिकमधील १३ घाटांवर अनुमाने १२ कोटी भाविक येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक लोकप्रतिनिधी, कुंभमेळा प्राधिकरण आणि विविध विभाग यांच्या समन्वयातून त्र्यंबक, रामकुंड, सीता गुंफा, साधूधाम, मुक्तीधाम आणि अन्य धार्मिक स्थळे येथे आरोग्यसुविधा सक्षम करण्यावर भर देण्यात यावा. सिंहस्थ कुंभपर्वाच्या काळात गर्दीमुळे संपर्क यंत्रणेत अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी आरोग्य विभागाने ‘वॉकी-टॉकी’चा (बिनतारी यंत्रणेचा) उपयोग करावा. देशभरातून येणार्‍या भाविकांनी कोणत्याही प्रकारची वैद्यकीय असुविधा होऊ नये, याची काळजी घ्यावी. आरोग्यसेवा व्यवस्थापनासाठी विविध स्तरांवर दायित्व निश्चित करण्यात आले आहे. भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने व्यापक सिद्धता ठेवावी. रोगराईचा संसर्ग रोखण्यासाठी नाशिक, त्र्यंबक, रामकुंड, सीतामंडी आणि अन्य सर्व धार्मिक स्थळे येथील स्वच्छतेवर विशेष भर द्यावा. पाण्याच्या स्रोतांची पडताळणी करावी.’’