
पणजी, ७ एप्रिल (वार्ता.) – प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची निर्मिती, आयात आणि विक्री करण्यावर सरकारने पूर्णपणे बंदी घातली आहे. वर्ष १९८६ च्या पर्यावरण संरक्षण कायदा कलम ५ अंतर्गत हा आदेश गोवा सरकारच्या पर्यावरण आणि हवामान पालट खात्याने ६ एप्रिल २०२६ या दिवशी प्रसारित केला आहे.
यंदापासून गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मूर्तीविक्रेत्यांसाठी नोंदणी पोर्टल (संकेतस्थळ) चालू करण्यात येईल. श्री गणेशमूर्तींची आयात किंवा विक्री करण्यासाठी विक्रेत्यांनी १५ जुलैपर्यंत या ‘पोर्टल’वर नोंदणी करणे आवश्यक आहे. या ‘पोर्टल’वर स्वतःचा पत्ता, मूर्ती कुठून आणणार ? मूर्तींची संख्या, गोव्याच्या सीमेवर मूर्ती कधी पोचतील ? याची सविस्तर माहिती द्यावी लागेल. तसेच मूर्तींमध्ये २० टक्क्यांपेक्षा अधिक प्लास्टर ऑफ पॅरिस नाही, असे प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल.
|
प्रतिवर्षी गोव्यात श्री गणेशचतुर्थीच्या काळात शेजारील राज्यांमधून मोठ्या प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची आयात केली जाते. या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे नद्या, तलाव, विहिरी आणि किनार्यावरील परिसंस्थेची हानी होते. या मूर्तींमध्ये वापरल्या जाणार्या रासायनिक रंगांमध्ये पारा, झिंक ऑक्साईड, क्रोमियम, शिसे यांसारखे विषारी घटक असतात. त्यामुळे जलचर प्राण्यांना, तसेच अशा जलचरांचे सेवन केल्यास मानवालाही धोका निर्माण होतो. त्यामुळे सागरी जीवसृष्टी, लोकांचे आरोग्य आणि पर्यावरण यांचा विचार करून सरकारने या मूर्तींवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ चिकणमाती किंवा शाडूमाती यांच्या मूर्तींना अनुमती असेल. या मूर्तींमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसचे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत ठेवण्याची मुभा असेल. त्याचप्रमाणे मूर्ती रंगवण्यासाठी पर्यावरणपूरक आणि नैसर्गिक रंगांचाच वापर करणे अनिवार्य असेल.
सीमांवर कडक पडताळणी
राज्याच्या सीमेवर प्रवेश करणार्या वाहनांची पडताळणी करण्याचे निर्देश अबकारी आणि वाहतूक आयुक्तांना दिले आहेत. यानुसार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती असलेली वाहने रोखली जातील किंवा वाहने जप्त करून पोलिसांच्या कह्यात दिली जातील.
श्री गणेशचतुर्थीच्या आधी १ महिना चित्रशाळांची पडताळणी
श्री गणेशचतुर्थीच्या एक महिना आधी चित्रशाळांची संयुक्त पडताळणी चालू केली जाईल. पोर्टलवर नोंदणी न करता चालू असलेली चित्रशाळा बंद करण्यात येईल आणि ३ सहस्र रुपये विलंब शुल्क आकारून नोंदणी करायला लावली जाईल. मूर्तींमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसचे प्रमाण २० टक्क्यांहून अधिक असल्यास विक्रेत्याला २५ सहस्र रुपये दंड भरावा लागेल. धोकादायक मूर्तींची विल्हेवाट लावल्याचे प्रमाणपत्र १५ दिवसांत सादर न केल्यास विक्रेत्याला अतिरिक्त ५० सहस्र रुपयांचा दंड भरावा लागेल.
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव