कणकवली आणि सावंतवाडी येथे दुकाने फोडणार्‍यांना रोहा येथून अटक

प्रतिकात्मक चित्र

कणकवली – कणकवली आणि सावंतवाडी शहरांत सलग २ दिवसांत एकूण १६ दुकाने फोडून पसार झालेल्या २ जणांचा सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या ३० घंट्यांत शोध घेऊन त्यांना रायगड जिल्ह्यातील रोहा येथून अटक केली. राहुल उपाख्य दिवाण ओमप्रकाश तोमर आणि राजपथ संतराम पाल (घोडदेव नाका, भाईंदर (पूर्व); मूळ रहाणार उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ४ एप्रिल या दिवशी कणकवली शहरात आणि ५ एप्रिल या दिवशी सावंतवाडी शहरात दुकाने फोडण्यात आली होती. या प्रकरणात संशयितांचा शोध घेण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला रेल्वे पोलिसांचे साहाय्य लाभले. या कामगिरीविषयी पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.