Nepal Online Gambling Ban : नेपाळमध्ये अवैध ऑनलाईन सट्टेबाजीवर बंदी

काठमांडू (नेपाळ) – नेपाळच्या दूरसंचार प्राधिकरणाने अवैध ऑनलाईन सट्टेबाजीवर बंदी घातली आहे. संचारमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सट्टेबाजीचे २८१ ‘ॲप्स’ आणि संकेतस्थळे यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याची कार्यवाही करण्यात आली. नेपाळमधील अर्थव्यवस्थेचे संरक्षण करण्यासाठी आणि युवकांना जुगाराच्या जाळ्यातून वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

नेपाळच्या सीमेपलीकडून जुगार आणि डिजिटल माध्यमातून अवैध सट्टा चालणार्‍या सट्टेबाजी टोळ्यांवर नेपाळ सरकारच्या कडक कारवाईमुळे परिणाम झाला आहे. ऑनलाईन सट्टेबाजीचे जाळे अनेक देशांशी जोडलेले असते आणि विविध माध्यमांतून ते कार्यरत असते. सूत्रांच्या माहितीनुसार भारत आणि नेपाळ या देशांमधील खुल्या सीमेमुळे सीमावर्ती भागांत दीर्घकाळापासून सक्रीय असलेल्या सट्टेबाजांच्या टोळ्या ‘ऑनलाइन’ आणि ‘ऑफलाइन’ (प्रत्यक्ष) दोन्ही माध्यमांतून आपला व्यवसाय चालवत होत्या. घराघरांत आणि शेतांमध्ये सट्टा लावून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केले जात होते. यात हवाला नेटवर्क आणि ‘डिजिटल पेमेंट’ प्रणालीचाही वापर होत होता. दोन्ही देशांच्या सुरक्षायंत्रणांमधील वाढत्या समन्वयामुळे या जाळ्यांची मुळे कमकुवत होत आहेत. त्यामुळे सट्टेबाज आता त्यांची ठिकाणे पालटत आहेत किंवा त्यांच्या कारवाया थांबल्या आहेत.

नेपाळ सरकारने कडक पावले उचलली असली, तरी ‘सट्टेबाज नवीन पद्धती अवलंबून पुन्हा सक्रीय होण्याचा प्रयत्न करू शकतात’, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

संपादकीय भूमिका

भारतात देशपातळीवर ऑनलाईन सट्टेबाजीवर कोणताही कठोर कायदा नाही. भारतानेही आता याकडे लक्ष देत कठोर कृती करण्याची आवश्यकता आहे !