महापालिका अर्थसंकल्पाविषयी माहिती देतांना आयुक्त के. मंजूलक्ष्मी
कोल्हापूर, २८ मार्च (वार्ता.) – कोल्हापूर महापालिकेचे ७५४ कोटी ७१ लाख रुपयांचे महसुली जमेचे कोल्हापूर महापालिकेचे वर्ष २०२६-२७ चे अंदाजपत्रक आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी स्थायी समितीला सादर केले. या अर्थसंकल्पात केंद्र आणि राज्य शासन अनुदान साहाय्य अंतर्गत भांडवली कामाअंतर्गत हाती घेण्यात आलेले प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याचे नियोजन, महापालिका महसुली उत्पन्न वाढवण्यास भर, नागरिकांना अधिकाधिक ‘ऑनलाईन’ सेवासुविधा पुरवण्यावर भर, सार्वजनिक स्वच्छता, सार्वजनिक शौचालये दुरुस्ती, घनकचरा प्रकल्प यांची काटेकोर कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी पत्रकारांना दिली.
अर्थसंकल्पातील प्रमुख प्रावधाने
१. ‘राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम निधी’ अंतर्गत परिख पूल नजिकचा रस्ता हा सिमेंट- क्राँक्रीटचा करण्यात आला आहे. यासाठी २ कोटी २५ लाख रुपयांचे प्रावधान करण्यात आले.
२. पायभूत सुविधांमध्ये दर्जेदार रस्ते करण्यासाठी ‘थर्ड पार्टी ऑडीट’, ‘वरिष्ठ अधिकार्यांद्वारे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी दर्जा पडताळणी, तसेच अन्य गोष्टींचा समावेश आहे.
३. ‘स्वच्छ भारत प्रकल्प’ अंतर्गत ‘२० टी.पी.डी. बायोगॅस प्रकल्प’ कार्यान्वित करण्यात आला आहे. ‘परिवहन ई-बस प्रकल्प’ काम पूर्ण करून घेण्यात आले.
४. महानगरपालिकेचे महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी घरपट्टी विभागाचे ११० कोटी १७ लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.