सिंहस्थ कुंभपर्वाची कामे गुणवत्तेसह गतीने पूर्ण करावीत ! – शिवेंद्रराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री

सिंहस्थ कुंभपर्व आढावा बैठक पार पडली !

नाशिक – नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणार्‍या आगामी सिंहस्थ कुंभपर्वानिमित्त सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे चालू असलेली सर्व कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्वक होतील, यावर अधिक भर देत कामांना गती द्यावी, असे विधान सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केले. येथे सिंहस्थ कुंभपर्व बैठकीत ते बोलत होते.

ते म्हणाले, ‘‘नाशिकमधील सर्व कामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्राधान्यक्रमातील आहेत. सिंहस्थ कुंभपर्व प्राधिकरणानेही त्यांच्या स्तरावर या कामांची त्रयस्थ पक्षाकडून पडताळणी केल्यास कामे गुणवत्तापूर्वक होतील, यासाठी दक्ष रहावे. संमती मिळालेली कामे तातडीने पूर्ण करावीत. वन विभाग आणि जलसंपदा विभाग यांनी रस्त्यांच्या कामांसाठी आवश्यक अनुमती देण्याची सत्वर कार्यवाही करावी. कामे विहित मुदतीत पूर्ण न झाल्यास दंडात्मक कारवाईविषयी अवगत करण्यात यावे.’’