Puri Ratna Bhandar : पुरी (ओडिशा) येथील जगन्नाथ मंदिरातील रत्नभांडारातील दागिने आणि मौल्यवान वस्तू यांची मोजणी चालू !

पुरी (ओडिशा) – येथील जगप्रसिद्ध श्री जगन्नाथ मंदिराच्या रत्नभांडारातील सोन्या-चांदीचे दागिने, तसेच मौल्यवान वस्तू यांची मोजणी २५ मार्चपासून चालू करण्यात आली आहे. अचूकता आणि पारदर्शकता येण्यासाठी या प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. वर्ष १९७८ नंतर प्रथमच भगवान जगन्नाथाच्या रत्नभांडाराचे इतक्या व्यापक वैज्ञानिक आणि प्रशासकीय पद्धतीने मूल्यांकन होत आहे.

१. जगन्नाथ मंदिर प्रशासनाचे मुख्य प्रशासक डॉ. अरविंद कुमार पाढी यांनी सांगितले की, पहिल्या दिवशी सुमारे ६ घंटे ‘गणती मानती’ (मोजणी) प्रक्रिया चालू होती, ज्यामध्ये ‘चल रत्न भांडार’मधील सुमारे ८० टक्के दागिन्यांची सूची बनवण्यात आली आहे. मंदिर प्रशासनाने अद्याप रत्नांचे प्रमाण किंवा वजन घोषित केलेले नाही. उर्वरित २० टक्के दागिन्यांची, तसेच रत्नभांडारमधील वस्तूंची मोजणी पुढील दिवस चालू रहाणार आहे.

२. भगवान जगन्नाथाच्या दैनंदिन पूजाविधीत वापरल्या जाणार्‍या सोन्याच्या दागिन्यांसह इतर मौल्यवान वस्तूंचे सविस्तर वर्णन आधुनिक यंत्रणांच्या साहाय्याने केले जात आहे. यावेळी मूल्यांकन प्रक्रिया कागदोपत्री करण्यासह यात अत्याधुनिक साधनांचा वापर करण्यात येत आहे. मंदिरातील खजिना आणि दागिने यांची अचूक रचना अन् नोंद करण्यासाठी ‘थ्रीडी मॅपिंग’ (विशेष संगणकीय प्रणालीचा वापर करून वस्तू, भूभाग किंवा वातावरण यांचे डिजिटल आणि त्रिमितीय चित्रण बनवण्याची प्रक्रिया) केले जात आहे. तसेच संपूर्ण प्रक्रियेचे उच्च दर्जातील छायाचित्रण आणि चित्रीकरण केले जात आहे.