भारतरत्न डॉ. पां.वा. काणे उपकेंद्राचे रूपांतर विस्तृत परिसरात व्हावे ! – प्रभारी कुलगुरु डॉ. अतुल वैद्य

पुढील पंचवार्षिक आराखडा तयार करणार

रत्नागिरी – कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे रूपांतर विस्तृत परिसरात व्हावे. उपकेंद्राला लवकरच ५ वर्षे पूर्ण होणार असून पुढील ५ वर्षांचा आराखडा बनवला जाणार आहे. त्यामध्ये संस्कृतच्या पारंपरिक अभ्यासक्रमासमवेत भारतीय ज्ञान परंपरा आणि दर्शनशास्त्र, वेद, उपनिषद हे सोप्या भाषेत सामान्यांपर्यंत पोचले पाहिजेत याकरता प्रकल्प केले जातील. या सर्वाचा वैज्ञानिक ऊहापोह व्हायला हवा. भारतरत्न डॉ. पां.वा. काणे यांचे विशेष दालन चालू करण्यासाठी प्रयत्न आहे, असे प्रतिपादन रामटेक येथील कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे प्रभारी कुलगुरु डॉ. अतुल वैद्य यांनी केले.

भारतरत्न डॉ. काणे रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राला २४ मार्चला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. डॉ. वैद्य यांचे स्वागत आणि सत्कार उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांना केला. डॉ. वैद्य यांनी उपकेंद्राची पहाणी केली, वर्गखोल्या, नव्याने बांधलेले नाट्यगृह, कार्यालयीन कामकाज, अभ्यासिका यांची पहाणी केली आणि नवनवीन प्रस्ताव देण्यास डॉ. काणे उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांना सांगितले आहे.

कुलगुरु डॉ. अतुल वैद्य म्हणाले,

१. कार्यभार स्वीकारल्यानंतर रत्नागिरी उपकेंद्राला प्रथमच धावती भेट दिली. उपकेंद्राचे काम प्रारंभीपासून अतिशय उत्तम रितीने चालू आहे. शून्यातून चालू झालेला हा प्रवास आता पुढच्या टप्प्यावर पोचला आहे. आता पुढच्या ५ वर्षांत या उपकेंद्राचे परिसरात रूपांतर व्हावे. पंचवार्षिक योजनांचा आराखडा आखण्यात येत आहे.

२. भारतीय ज्ञान परंपरा याच्यावर भर असला पाहिजे, समवेत संस्कृतचे नियमित विषय, नाट्यशास्त्र, साहित्य, व्याकरण अभ्यासक्रम चालू रहातील.

३. दर्शनशास्त्र, वेद किंवा उपनिषद या सर्व गोष्टींचा वैज्ञानिक ऊहापोह व्हावा. समाजापुढे उपनिषद, दर्शनाला मोक्षाचा मार्ग म्हणून पाहिले जाते, ते योग्य आहे; परंतु या या दर्शनशास्त्राचा मूळ उद्देश सृष्टीला समजून घेणे, सृष्टीचा उगम कसा झाला ? हा आहे. आधुनिक भाषेत बोलायचे तर दर्शनाचे वजन किंवा आकारमान आणि ऊर्जा कोणत्या स्वरूपाची आहे त्याची क्षमता याचा ऊहापोह व्हावा. त्यामुळे या दर्शनशास्त्रांकडे वेगळ्या पद्धतीने पाहिले पाहिजे. त्याचे वेगवेगळे प्रकल्प व्हावेत.

४. उपकेंद्राची व्याप्ती अल्प असली तरी परिसर या रूपाने नावारूपाला यावे. रत्नागिरीत संस्कृतज्ञ, अभ्यासक होऊन गेले आहेत. आता नव्या पिढीसाठी भारतीय ज्ञान परंपरेचा सोप्या भाषेत प्रसार व्हावा. याकरिता उपकेंद्राने योगदान द्यावे.

या वेळी कुलगुरु डॉ. अतुल वैद्य यांनी उपकेंद्रातील कोकणातील विद्वानांचे संस्कृत साहित्यातील योगदान यावरील प्रदर्शनाला भेट दिली. त्याचप्रमाणे उपकेंद्राची प्रकाशने आणि इंटरडिसीप्लिनरी रिसर्च इन धर्मशास्त्र या पूर्ण झालेल्या प्रकल्पाचे कार्य जवळून पाहिले. शिवाय उपकेंद्रातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक योग भवनाला भेट देऊन तिथे सुधारणांच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.

डॉ. वैद्य यांनी सांगितले की, भारतरत्न डॉ. काणे संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे हे लवकरच आराखडा बनवून देणार आहेत. त्यानंतर विद्यापिठाकडून प्रशासकीय, आर्थिक साहाय्य देण्याचा प्रयत्न करू. भारतीय ज्ञान परंपरेला विज्ञानाच्या माध्यमातून पुढे आणण्यासाठी कार्यरत राहील. येणार्‍या अनेक पिढ्यांना यावेसे वाटेल, शिकावेसे वाटेल. याकरता उपकेंद्राचे संचालक आणि सर्व कर्मचार्‍यांना सदिच्छा देतो.

या वेळी रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे, निरी संस्थेतील मुख्य शास्त्रज्ञ डॉ. महेंद्र पाटील, रत्नागिरीतील विविध संस्थांचे आरि संलग्नित महाविद्यालयांचे पदाधिकारी, विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते.