पडेल येथे सकल हिंदू संमेलनात हिंदूंना संघटित होण्याची हाक !

४०० हून अधिक धर्माभिमानी हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

डॉ. रविकांत नारकर

देवगड – हिंदु धर्म, संस्कृती, हिंदु परंपरांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या उद्देशाने ‘सकल हिंदु समाज पडेल मंडल’च्या वतीने २२ मार्च २०२६ या दिवशी तालुक्यातील पडेल कॅन्टीन येथील हरदेव निवास समोरील पटांगणात भव्य सकल हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनातील मान्यवर वक्त्यांनी देव, देश आणि धर्म यांवरील वाढत्या आघातांविषयी हिंदूंना अवगत करून यांच्या रक्षणासाठी हिंदूंनी संघटित झाले पाहिजे, असे आवाहन केले. या संमेलनाला ४०० हून अधिक धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते.

अयोध्या येथील राममंदिरच्या स्थापनेसाठी हिंदूंनी केलेल्या संघर्षाची आठवण करून देणे, तसेच वाढते धर्मांतर, लव्ह जिहाद, मंदिर सरकारीकरण, गोहत्या, भूमी (लँड) जिहाद आदी हिंदु समाजासमोरील धोके यांविषयी समाजात जागृती करणे हा मुख्य उद्देश ठेवून विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून श्री. श्रीनिवास पेंडसे (संगमेश्‍वर) आणि प्रमुख पाहुणे म्हणून हिंदु जनजागृती समितीचे डॉ. रविकांत नारकर (पडेल, देवगड) यांना आमंत्रित करण्यात आले होते.

संमेलनाला उपस्थित हिंदू

श्री. पेंडसे यांनी मार्गदर्शनात सध्याची युद्धजन्य परिस्थिती आणि हिंदूंची मानसिकता यांविषयी सांगून ‘येणार्‍या काळात हिंदु समाजाचे संघटन करणे, ही काळाची आवश्यकता आहे. यासाठी जात-पात, धर्म, संप्रदाय विसरून हिंदू या एका संज्ञेखाली सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे’, असे आवाहन केले.

डॉ. नारकर यांनी ‘हिंदु धर्मावरील आघात मांडतांना मोठ्या प्रमाणात होणारे हिंदूंचे धर्मांतर, लव्ह जिहाद, मंदिर सरकारीकरण, गोहत्या, भूमी जिहाद आदी विषय आकडेवारीसहित मांडले. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना झाली पाहिजे, या विचाराने सकल हिंदु समाजाने एकत्र येऊन काम केले पाहिजे’, असे आवाहन केले. ‘सर्व हिंदूंना संघटित होण्यासाठी भक्ती, शक्ती, बुद्धी आणि प्रेरणा मिळो’, अशी प्रार्थना डॉ. नारकर यांनी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी केली.

या वेळी प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या मेघा बहन, तसेच संत निरंकारी मंडळाचे डॉ. अजित टुकुरल यांनी विचार मांडले. संमेलनाचा उद्देश डॉ. पूजा मालपेकर यांनी विशद केला. पडेल येथील श्री रवळनाथ मंदिराचे अध्यक्ष श्री. केवळ ठाकूर देसाई यांनी मनोगत व्यक्त केले.