समाजकंटकांनी राष्ट्रीय कथाकार महेशानंद महाराज यांच्या धार्मिक कार्यक्रमाचे फलक फाडले !

  • सोलापूर येथील ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चा प्रसार करणारे साहित्य सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित केल्याचे कारण

  • समाजकंटकांवर कारवाई होण्यासाठी दीड सहस्र नागरिकांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा

  • वाफळे ग्रमस्थांनी ३ दिवस गाव बंद करून नोंदवला निषेध !

‘श्रीमद्भागवतकथे’च्या प्रचारासाठी गावात लावलेला फलक

सोलापूर – राष्ट्रीय कथाकार महेशानंद महाराज यांनी ११ मार्च या दिवशी सोलापूर येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेची माहिती ‘व्हॉट्सअ‍ॅप’द्वारे प्रसारित केली होती, तसेच सभेचा सामाजिक माध्यमांद्वारे प्रसार केला होता. याचा राग मनात धरून मोहोळ तालुक्यातील वाफळे गावात आयोजित करण्यात आलेल्या ‘श्रीमद्भागवतकथा’ या धार्मिक कार्यक्रमाचे फलक समाजकंटकांनी फाडले. या फलकांवर श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र होते. या प्रकरणी महाराजांच्या पत्नी सौ. सोनाली चव्हाण यांनी पुढाकार घेऊन दीड सहस्र नागरिकांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला, तसेच या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी ३ दिवस गाव बंद ठेवून निषेध नोंदवला. (हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रचार केल्यावर जर समाजकंटक आक्रमण करत असतील, तर हे अत्यंत गंभीर असून पोलीस प्रशासनाने यावर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे ! हिंदु राष्ट्राची मागणी भारतात नाही, तर पाकिस्तानात जाऊन करायची का ? – संपादक)

१. वाफळे गावात १९ ते २५ मार्च या कालावधीत ‘श्रीमद्भागवतकथे’चे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी गावात विविध ठिकाणी श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची चित्रे असलेले फलक लावण्यात आले होते.

२. १७ मार्च या दिवशी काही समाजकंटक हे राष्ट्रीय कथाकार महेशानंद महाराज यांच्या घरी गेले. समाजकंटकांनी महाराजांच्या अनुपस्थितीत त्यांची विचारणा करत त्यांच्या पत्नीशी उद्धटपणे संभाषण केले. (महाराज घरी नसतांना तेथे जाऊन त्यांच्याविषयी विचारणा करण्याची मजल समाजकंटकांची जाते; म्हणजे ते किती उद्दाम आणि निर्ढावलेले आहेत, हे लक्षात येते. अन्य धर्मीय त्यांच्या धर्माचा प्रसार करणार्‍यांना साहाय्य करतात. याउलट हिंदु धर्माचा प्रसार करणार्‍या हिंदूंना साहाय्य करणे लांबच, जन्महिंदू अशांना त्रास देण्याचे कार्य करतात ! – संपादक)

महेशानंद महाराज आणि त्यांच्या पत्नी सौ. सोनाली चव्हाण

३. या वेळी समाजकंटकांनी शिवीगाळ आणि दमदाटी करत ‘धार्मिक कार्यक्रम होऊ देणार नाही’, अशी धमकी दिली. यानंतर त्यांनी गावात लावलेले धार्मिक कार्यक्रमाचे फलक फाडून टाकले.

४. या प्रकरणी महेशानंद महाराज यांची पत्नी सौ. सोनाली चव्हाण यांनी धाडस दाखवत पुढाकार घेऊन दीड सहस्र नागरिकांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. या संदर्भात महाराजांचा कार्यक्रम अन्य ठिकाणी चालू होता, तर त्या धर्मकार्यात अडथळा नको म्हणून सौ. सोनाली चव्हाण यांनी या संदर्भात महाराजांना काही न कळवता सर्व कृती पुढाकार घेऊन केल्या.

‘श्रीमद् भागवत कथे’च्या प्रचारासाठी गावात लावलेले फलक समाजकंटकांनी फाडून टाकल्यानंतर शिल्लक राहिलेला सांगाडा

५. या घटनेत सौ. सोनाली चव्हाण यांच्या तक्रारीवरून ३ समाजकंटकांच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट करण्यात आली असून पुढील अन्वेषण चालू आहे.

६. पोलीस अधीक्षक आणि अधिकारी यांनी गावाला भेट देऊन समाजकंटकांवर कारवाई केली.

समाजकंटकांचे अडथळे आल्यावर धर्मकार्य दुप्पट वेगाने पुढे नेण्याचा निर्धार करणारे महेशानंद महाराज !

या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करतांना महेशानंद महाराज म्हणाले, ‘‘हिंदु धर्माचे रक्षण करण्यासाठी सनातनच्या रूपात या पृथ्वीतलावर भगवंत अवतरला आहे. ‘सनातनचा प्रत्येक साधक ईश्वराचा कण आणि कण आहे’, त्या रूपामध्ये ईश्वर सनातन धर्माचे रक्षण करत आहे. सनातन धर्माचे रक्षण करतांना मला जो विरोध झाला, यावरून हे कार्य ईश्वरापर्यंत पोचले आहे, याची मला पावती मिळाली. आता दुप्पट जोमाने धर्माचे रक्षण करण्याचे कार्य करणार आहे.’’