सौ. रूपाली चाकणकर यांचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचे त्यागपत्र !

मुंबई – महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर यांनी पदाचे त्यागपत्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केले आहे. वैयक्तिक कारणास्तव स्वेच्छेने पदाचे त्यागपत्र देत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे हे त्यागपत्र आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ‘सद्यःपरिस्थिती आणि चालू असलेले अन्वेषण या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. हे अन्वेषण निष्पक्ष आणि पारदर्शक होण्याच्या दृष्टीने मी त्यांचे त्यागपत्र पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवत आहे’, असा संदेश ‘एक्स’ खात्यावरून प्रसारित केला आहे.

अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटकेत असलेला भोंदूबाबा अशोक खरात याच्यासमवेत रूपाली चाकणकर यांचे व्हिडिओ आणि छायाचित्रे प्रसारित झाली. खरात यांना चाकणकर पाठीशी घालत असल्याचे, तसेच अनेक राजकीय व्यक्तींना त्यांच्याकडे नेल्याचे आरोप चाकणकर यांच्यावर होत आहेत. हे लक्षात घेऊन चाकणकर यांनी त्यागपत्र दिले. चाकणकर यांनी त्यांच्या कुटुंबाने खरातला गुरु मानल्याने गुरुपौर्णिमेला पतीसमवेत त्यांची पाद्यपूजा केल्याचे म्हटले. त्यांच्याविषयीच्या गोष्टी ऐकून त्यांना धक्का बसला. ‘त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी माहिती नव्हते’, असे त्यांनी म्हटले.

या प्रकरणी सौ. चाकणकर यांची नार्काे चाचणी करण्याची मागणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.

(वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

खरात प्रकरणातील अन्य घडामोडी

१. खरातची मालमत्ता ५०० कोटी रुपयांहून अधिक असून ती त्याने पत्नी, मुलगी आणि अन्य नातेवाईक यांच्या नावावर घेतल्याचे पुढे आले. मुलींवर तो विधीच्या नावाखाली लैंगिक अत्याचार करत असे. एका पीडितेने माध्यमांसमोर येऊन तिच्यावर अनेकदा बलात्कार झाल्याचे सांगितले.

२. इंटरनेट आणि केबल जोडण्याच्या उपकरणाद्वारे अल्पवयीन मुलीवर केलेल्या अघोरी उपचारांचा व्हिडिओ समोर आला.

३. खरातचा संबंध शाळेच्या खोट्या ओळखपत्रांच्या प्रकरणाशी जोडला गेला. त्याच्या भावाला तत्कालीन मंत्र्यांच्या मध्यस्थीने शालार्थ ओळखपत्रे मिळाल्याचेही समजते.

४. ‘खरातच्या संस्थेला धरणाचे पाणी देण्याचा ‘शासन आदेश’ काढल्याची माहिती घेतो’, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले.

५. शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय लोंढे यांच्याशी खरातचे व्यावसायिक संबंध असल्याचे पुढे आले. ‘ईशान्येश्वर मंदिरासाठी रस्ता बनवण्यासंदर्भात खरात हे एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी आले असतांना त्यांच्याशी ओळख झाली,’ असे केसरकर म्हणाले.

६. हे प्रकरण सरकारला ठाऊक होते, त्यात निम्मे मंत्रीमंडळ असल्याने सरकारला बाहेर येऊ द्यायचे नव्हते. पीडिता पुढे आली नसती, तर सरकारने प्रकरण दाबले असते, असे ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले.

७. मुंबईत कार्यरत असलेले उपजिल्हाधिकारी खरातला आर्थिक रसद पुरवत असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले. यामुळे प्रशासकीय यंत्रणेतील लोकांचेही त्याच्याशी संबंध आहेत का ?, असा असे संशय आहे.