Karnataka Speaker Walkout : सरकारवर संतापलेले कर्नाटक विधानसभेचे सभापती सभागृहातून निघून गेले !

  • आमदारांच्या प्रश्नांना उत्तरे न देण्याच्या सरकारच्या भूमिकेविषयी संताप व्यक्त !

  • कर्नाटकाच्या काँग्रेस सरकारची नाचक्की !

कर्नाटक विधानसभेचे सभापती यू.टी. खादर

बेंगळुरू (कर्नाटक) – आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांना लेखी स्वरूपात उत्तरे न दिल्याविषयी संबंधित मंत्री आणि सचिव यांनी स्पष्टीकरण देईपर्यंत कामकाज चालवणार नाही, असे म्हणत कर्नाटक विधानसभेचे सभापती यू.टी. खादर विधानसभेचे कामकाज स्थगित करून निघून गेले. खादर यांच्या या कृतीमुळे सरकारची मोठी नाचक्की झाली आहे. मंत्री आणि सरकार यांच्या भूमिकेवर सभापती खादर प्रचंड संतापले. लेखी उत्तरे देण्याविषयी सभापती सरकारला वारंवार सूचना देत होते. तरीही १६ मार्च या दिवशी २३० प्रश्नांपैकी केवळ ८४ प्रश्नांची उत्तरे सरकारकडून मांडण्यात आली. यावरून विधानसभेत विरोधी पक्षनेते आर्. अशोक यांनी सरकारला धारेवर धरले.

१. या वेळी सभापती खादर म्हणाले, ‘‘मी हे सूत्र अत्यंत स्पष्टपणे सांगितले आहे. सदन मंत्र्यांसाठी चालत नाही. हे अधिवेशन आमदारांसाठी असते. प्रत्येकाला तारांकित प्रश्न विचारणे शक्य नसते. दिवसाला केवळ १५ प्रश्नांची उत्तरे दिली जाऊ शकतात. उर्वरित प्रश्नांची उत्तरे सरकारने लेखी स्वरूपात देणे आवश्यक आहे; पण ती दिली जात नाहीत. असे असेल तर आमदारांनी सदनात कशासाठी यावे ?’’

२. ‘प्रश्नांना उत्तरे नाहीत, मंत्री वेळेवर सभागृहात येत नाहीत. मी सलग ४ वेळा सूचना देऊनही सुधारणा झालेली नाही. सरकारची ही वृत्ती योग्य नाही. असे असेल, तर सदन कसे चालवायचे ?’, असा प्रश्न विचारत सभापतींनी संताप व्यक्त केला.

३. ‘जोपर्यंत मंत्री आणि सचिव यावर स्पष्टीकरण देत नाहीत, तोपर्यंत सदन चालवणार नाही’, असे सांगत सभापती खादर पिठावरून उठून निघून गेले.

४. सरकारच्या कारभारावर अप्रसन्नता व्यक्त केलेले सभापती यू.टी. खादर यांची मनधरणी करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी प्रयत्न केले.

५. सभापतींच्या दालनात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि विरोधी पक्षनेते यांच्याशी बैठक झाली असून, सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सभापती खादर यांनी दिली.