आधुनिक औषधशास्त्र शिकलेल्या ८ सहस्र होमिओपॅथी वैद्यांचे प्रमाणपत्र न्यायालयीन प्रक्रियेत अडकले !

‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चा विरोध !

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई, १६ मार्च (वार्ता.) – होमिओपॅथी वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या वैद्यांना एका वर्षाचे ‘आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रमा’चे प्रशिक्षण देऊन त्यांना ‘ॲलोपॅथी’ औषध देण्याचे प्रमाणपत्र देण्याला ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने विरोध केला आहे. या विरोधात असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. त्यामुळे आधुनिक औषधशास्त्राचा एका वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ८ सहस्र वैद्यांचे प्रमाणपत्र रोखण्यात आले आहे, अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली. आमदार डॉ. तुषार राठोड यांनी याविषयीची लक्षवेधी सूचना सभागृहात उपस्थित केली होती.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, ‘‘३३ संस्थांद्वारे हा एक वर्षाचा आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिकवण्यात आला. अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या वैद्यांची नोंदणी करण्याचा अंतरिम आदेश न्यायालयाने दिला. त्यानुसार आतापर्यंत २ सहस्र १८२ वैद्यांची नोंदणी करण्यात आली आहे; मात्र या प्रकरणी अद्यापही न्यायालयाने अंतिम आदेश दिलेला नाही. त्यामुळे नोंदणी झाल्यानंतरही या वैद्यांना प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल.’’