गॅस सिलिंडरची टंचाई; शिर्डी येथे भाविकांनाही फटका !

प्रसाद म्हणून १ लाडू, महाप्रसादामध्ये १ भाजी, तांदळाची खिचडी

शिर्डीतील साईबाबा मंदिर

शिर्डी (अहिल्यानगर) – साईबाबा मंदिरात येणार्‍या भाविकांना प्रसाद म्हणून २ लाडू असलेल्या पाकिटांची विक्री केली जाते, तसेच दर्शन रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना ५० सहस्र बुंदीची पाकिटे विनामूल्य दिली जातात. परंतु सध्या गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे भाविकांना प्रसाद म्हणून १ लाडूचे पाकिट देण्याचा निर्णय ‘साई संस्थान’ने घेतला आहे. लाडू बनवण्यासाठी उपलब्ध असलेला गॅसचा साठा १० ते १२ दिवस पुरेल एवढाच आहे. प्रसाद म्हणून १ लाडू, जेवणात १ भाजी, डाळ आणि भाताऐवजी तांदळाची खिचडी दिली जात आहे. या परिस्थितीत संस्थेने उभा केलेल्या ‘सौर ऊर्जा प्रकल्पा’चा मोठा आधार मिळत आहे, असे ‘साई इन्स्टिट्यूट’ने सांगितले.

नाशिकमधील मनमाड येथील ‘इंडेन बॉटलिंग प्रकल्पा’तून गॅस सिलिंडरचा पुरवठा अल्प होत आहे. प्रतिदिन १०० वाहनांतून येणारा सिलिंडर आता केवळ ३५ वाहनांतून येत आहे. प्रकल्पाच्या २ ‘फिलिंग’ (भरणा करावयाच्या) ठिकाणांपैकी १ ठिकाण चालू आहे. ज्यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत होत आहे.