हिंदूंना हिंदु असल्याची जाणीव करून दिली, तरच ते हिंदु राष्ट्रासाठी उभे रहातील ! – प्रसाद काथे, संपादक, ‘जय महाराष्ट्र’

राष्ट्ररक्षण, धर्मजागृती आणि हिंदूसंघटन यांची २६ वर्षांची यशस्वी वाटचाल !

  • समाजात राष्ट्र आणि धर्म निष्ठा रुजवणार्‍या दैनिक ‘सनातन प्रभात’चा वर्धापनदिन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा !

  • ‘सनातन प्रभात’चे वाचक, हितचिंतक, विज्ञापनदाते आणि राष्ट्रप्रेमी यांची उपस्थिती !

दीपप्रज्वलन करतांना डावीकडून सद्गुरु अनुराधा वाडेकर, सौ. रूपाली वर्तक, डॉ. रवींद्र प्रभुदेसाई आणि श्री. प्रसाद काथे

मुंबई, १० मार्च (वार्ता.) – हिंदूंना हिंदु असल्याची जाणीव करून दिली, तरच ते हिंदु राष्ट्रासाठी उभे रहातील. हे कार्य ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून प्रभावीपणे केले जात आहे. आत्मभान टिकवण्याचे काम ‘सनातन प्रभात’ करत आहे. सतीचे वाण पेलण्यासाठी तशी नीती असावी लागते. आपले विचार ८० कोटी हिंदूंपर्यंत पोचू नयेत, यासाठी १०० कोटी लोक प्रयत्न करत आहेत; कारण हिंदु समाज जागृत झाला, तर तो थोपवता येणार नाही, हे त्यांना ठाऊक आहे. हिंदूंनी न्यूनगंड सोडला पाहिजे. सन्मानाने जगता येण्यासाठी केवळ हीच भूमी आहे. क्षात्रतेजाची उपासना करणे काळाची आवश्यक आहे. ही उपासना केली, तर भविष्यात आपण टिकू शकतो. एकेकाळी आपण हिंदुकुशपर्यंत होतो; परंतु आता गोवंडीतही नाही. त्यामुळे हिंदुत्वाची भूमिका सातत्याने मांडायला हवी. भारत हिंदूंसाठी आहे; परंतु हिंदूंसाठी भारत एकमेवच आहे, हे हिंदूंनी समजून घ्यायला हवे, असे विधान ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीचे संपादक श्री. प्रसाद काथे यांनी केले.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी गेली २६ वर्षे अखंड कार्यरत असलेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या मुंबई, ठाणे, रायगड, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ आवृत्तीचा २६ वा वर्धापनदिन सोहळा दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्र येथे उत्साहपूर्ण वातावरणात १० मार्च या दिवशी पार पडला. यात मार्गदर्शन करतांना श्री. काथे बोलत होते. या वेळी व्यासपिठावर ‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि.’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई आणि दैनिक ‘सनातन प्रभात’च्या उपसंपादिका सौ. रूपाली अभय वर्तक उपस्थित होत्या. त्यांनीही सर्वांना मार्गदर्शन केले. या सोहळ्याला ‘सनातन प्रभात’चे धर्माभिमानी वाचक, हितचिंतक, विज्ञापनदाते, तसेच साधक यांची उपस्थिती लाभली.

श्री. प्रसाद काथे

वर्धापनदिन सोहळ्याचा प्रारंभ सनातनचे श्री. जयदीप शेडगे यांनी शंखनाद करून, तसेच सनातनच्या धर्मप्रसारक सद्गुरु अनुराधा वाडेकर, ‘सनातन प्रभात’च्या उपसंपादिका सौ. रूपाली वर्तक, ‘पितांबरी प्रॉडक्ट्स’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई आणि ‘जय महाराष्ट्र’ वृतवाहिनीचे संपादक श्री. प्रसाद काथे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. नंतर वेदमंत्रपठण झाले. ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूहाचे संस्थापक संपादक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाचे वाचन सनातनच्या सौ. भक्ती गैलाड यांनी केले.

‘सनातन प्रभात’ वर्धापनदिन सोहळा वृत्तांत विशेष !

सोहळ्याला उपस्थित वाचक आणि हितचिंतक, तसेच सनातनच्या धर्मप्रसारक सद्‌गुरु अनुराधा वाडेकर

‘सनातन प्रभात’चे कार्य राष्ट्र उभारणीसाठी ! – डॉ. रवींद्र प्रभुदेसाई, ‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’चे व्यवस्थापकीय संचालक

आजची वर्तमानपत्रे ही नफा मिळवण्यासाठी, निधर्मी विचारसरणीला बांधलेली, काही डाव्या विचारसरणीला वाहिलेली, तर काही सरकारच्या विरोधात लिहिणारी असतात. खप वाढवण्यासाठी बातम्या नकारात्मक पद्धतीने प्रसिद्ध केल्या जातात. मोठा अपघात झाला, मोठा अपहार झाला की त्याची बातमी होते; पण कुणी दानधर्म केले, समाजकार्य केले, तर त्या बातम्या दिसत नाहीत. राष्ट्र उभारणीच्या बातम्या अपवादात्मक असतात. ‘सनातन प्रभात’ने प्रारंभीपासूनच नकारात्मक बातम्या टाळल्या. राष्ट्र, धर्म, समाज यांसाठीच वाहून घेतले. हे ‘सनातन प्रभात’चे वेगळेपण आहे. हिंदु राष्ट्र स्थापण्याची वेळ आली आहे. ईश्वरेच्छेने अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाने हिंदु राष्ट्र स्थापन होईल !

‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यम समूह हा हिंदु राष्ट्राच्या वैचारिक पुनरुत्थानाच्या चळवळीतील एक घटक ! – सौ. रूपाली वर्तक, उपसंपादिका, सनातन प्रभात

‘सनातन प्रभात’ने राष्ट्र आणि धर्म यांच्या विचारांचे बीज पेरण्याचे जे कार्य केले आहे, त्याचा आज वटवृक्ष झाला. हिंदुविरोधी वातावरणात जन्मलेल्या ‘सनातन प्रभात’चे घोषवाक्यच मुळी होते, ‘हिंदु राष्ट्राच्या, म्हणजे रामराज्याच्या स्थापनेसाठी ‘सनातन प्रभात !’ संसदेतही ‘हिंदु राष्ट्रा’ची मागणी होणे, ही ‘सनातन प्रभात’ने आरंभलेल्या कार्याची फलश्रुती म्हणावी लागेल. ‘सनातन प्रभात’ केवळ प्रसारमाध्यम समूह नव्हे, तर हिंदु राष्ट्राच्या वैचारिक पुनरुत्थानाच्या चळवळीतील एक घटक बनला आहे. ‘सनातन प्रभात’ने दिलेल्या वृत्तांमुळे आदर्श समाजव्यवस्थेच्या दिशेने छोटे-मोठे परिवर्तन चालू झाले आहे. वाचकांनीही रामराज्य स्थापनेच्या या कार्यात सहभागी होऊन खारीचा वाटा उचलावा !

सन्मान : सनातनच्या धर्मप्रसारक सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचा सन्मान सनातन संस्थेच्या सौ. दीप्ती बोंगुलवार यांनी केला.

वर्धापनदिनाचा व्हिडओ पहा . . . 

वाचकांचे मनोगत

हिंदु धर्म, संस्कृती, राष्ट्र आणि समाजासाठी कार्य करणारे दैनिक ! – डॉ. श्यामला मुजुमदार, प्राध्यापिका, नवीनचंद्र मेहता इन्स्टिट्यूट

दैनिक ‘सनातन प्रभात’ हे हिंदु धर्म, संस्कृती, राष्ट्र आणि आपला समाज यांसाठी कार्य करणारे दैनिक आहे. समाजात जेव्हा हिंदु धर्माविरोधात प्रचार होतो, दैनिक ‘सनातन प्रभात’ने त्याचे सडेतोड खंडण वेळोवेळी केले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक यांनी ‘केसरी’तून जनजागृती केली आणि आपण स्वातंत्र्य मिळवले. आजच्या समाजाला जागृत करून दैनिक ‘सनातन प्रभात’चे संस्थापक संपादक डॉ. आठवले यांनी ज्या उद्देशाने दैनिक चालू केले, ते हिंदु राष्ट्र निश्चितच येईल !

 सत्कार

‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीचे संपादक श्री. प्रसाद काथे यांचा सत्कार हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांनी शाल, श्रीफळ आणि सनातन संस्थेचा ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ हा ग्रंथ भेट देऊन केला, तर डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांचा सत्कार सनातन संस्थेचा ‘साधनेचे मौलिक दृष्टीकोन’ हा ग्रंथ आणि पुष्पगुच्छ देऊन ‘पेंडुरकर ज्वेलर्स’चे मालक

श्री. अजित पेंडुरकर यांनी केला. ‘सनातन प्रभात’च्या उपसंपादिका सौ. रूपाली वर्तक यांचा सत्कार सनातन संस्थेचा ‘साधना शिकवण्याच्या पद्धती’ हा ग्रंथ आणि पुष्पगुच्छ देऊन सनातनच्या साधिका सौ. वैशाली मेहेत्रे यांनी केला.

 उपस्थित मान्यवर

‘पेंडुरकर ज्वेलर्स’चे मालक तथा महाराष्ट्र मंदिर महासंघाचे मुंबई संयोजक श्री. अजित पेंडुरकर, भाजपचे नेते आणि व्यावसायिक श्री. प्रशांत काकडे, भाजपचे श्री. कृष्णा पाटील, अभिनेत्री आणि निर्माती सौ. अर्चना नेवरेकर, अधिवक्ता प्रथमेश गायकवाड, अधिवक्त्या सुरभी सावंत, अधिवक्ता प्रसाद सकपाळ, कीर्ती महाविद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री. विठ्ठल सोनटक्के, अधिवक्ता श्री. रमेश साहू