गोव्यात ‘सरकार तुमच्या दारी’ उपक्रमावर २ वर्षांत ३ कोटी ७५ लक्ष रुपये खर्च

८ स्थानांपैकी कोलवाळ आणि डिचोली वगळता इतर प्रत्येक ठिकाणी ३० ते ४० लक्ष रुपये खर्च

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी, ८ मार्च (वार्ता.) – गोवा सरकारने ‘सरकार तुमच्या दारी’ या उपक्रमाच्या अंतर्गत वर्ष २०२१ आणि वर्ष २०२२ या २ वर्षांमध्ये एकूण ३ कोटी ७५ लक्ष रुपये खर्च केले आहेत. फोंडा येथे फेब्रुवारी २०२६ मध्ये अशाच प्रकारे उपक्रम घेण्यात आला; मात्र त्याचे देयक (बिल) अजून आलेले नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा विधानसभेत दिली आहे. ‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई आणि काँग्रेसचे आमदार कार्लुेस फरेरा यांनी विचारलेल्या एका संयुक्त प्रश्नावर दिलेल्या लेखी उत्तरात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली आहे.

ते पुढे म्हणाले, ‘‘वर्ष २०२१ मध्ये ‘सरकार तुमच्या दारी’ हा उपक्रम काणकोण, कोलवाळ, डिचोली, पेडणे, सासष्टी, मुरगाव, सांखळी, दोना पावला, कुडचडे, हळदोणा आणि शिरोडा अशा एकूण ८ ठिकाणी घेण्यात आला. यामध्ये सांखळी येथे झालेल्या कार्यक्रमात सर्वाधिक ४० लक्ष ३० सहस्र रुपये, तर कोलवाळ येथे झालेल्या कार्यक्रमात सर्वांत अल्प म्हणजे २ लक्ष ६४ सहस्र रुपये खर्च करण्यात आले. याबरोबरच काणकोण येथे ३७ लक्ष ५१ सहस्र रुपये, कुडचडे आणि शिरोडा येथील कार्यक्रमावर एकूण ३१ लक्ष ११ सहस्र रुपये, तसेच दोना पावला, पेडणे आणि हळदोणा येथे झालेल्या प्रत्येक कार्यक्रमावर ३१ लक्ष ८ सहस्र रुपये, मुरगाव येथे २९ लक्ष ३२ सहस्र रुपये आणि डिचोली येथे झालेल्या कार्यक्रमात ९ लक्ष ३२ सहस्र रुपये खर्च करण्यात आला. वर्ष २०२२ मध्ये नेत्रावळी आणि सांगे येथे अशा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आणि या कार्यक्रमासाठी या दोन्ही ठिकाणांवर मिळून एकूण ७० लक्ष २ सहस्र रुपये खर्च करण्यात आला.

‘जनता दरबारा’चे ७ वेळा आयोजन

गोव्यात वर्ष २०२३ मध्ये ७ वेळा ‘जनता दरबारा’चे आयोजन करण्यात आले; मात्र ‘जनता दरबार’ उपक्रमावर सामान्य प्रशासन खात्याने कसलाच खर्च केलेला नाही. ‘जनता दरबार’ आणि ‘सरकार तुमच्या दारी’ या दोन्ही उपक्रमांमध्ये नागरिकांनी मांडलेल्या समस्या संबंधित खात्याकडे तात्काळ पाठवण्यात आल्या आहेत. हे उपक्रम सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोचवण्यासाठी घेण्यात आले, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.