Israel Iran War : आमचा उद्देश इराणमध्ये सत्तापालट घडवणे असून युद्धसमाप्तीसाठी ठराविक कालमर्यादा निश्चित नाही ! – इस्रायलची स्पष्टोक्ती

इस्रायलचे परराष्ट्रमंत्री गिदोन साअर

तेल अविव (इस्रायल) / इस्लामाबाद (पाकिस्तान) / तेहरान (इराण) / वॉशिंग्टन डीसी (अमेरिका) – ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ या मोहिमेत इस्रायलचे उद्दिष्ट पूर्णपणे स्पष्ट आहे; मात्र युद्धसमाप्तीची कोणतीही कालमर्यादा निश्चित केलेली नाही. आमच्यासाठी उद्दिष्ट राजकीय आणि सैनिकी या दोन्ही पातळ्यांवर सत्तापालट घडवणे आहे; परंतु प्रत्यक्ष पालट इराणच्या जनतेलाच घडवून आणावा लागेल. आम्ही तेथील लोकांना ती संधी देत आहोत. ‘तेथे नेतृत्व कोण करेल’, हे ठरवणे आमचे काम नाही. हा निर्णय इराणी जनतेने स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांद्वारे घ्यावा, असे विधान इस्रायलचे परराष्ट्रमंत्री गिदोन साअर यांनी केले आहे.

युद्ध १०० दिवसांपर्यंत चालू शकते ! – अमेरिका

अमेरिकेचा संरक्षण विभाग ‘पेंटागॉन’ इराणसमवेत अशा युद्धाची सिद्धता करत आहे, जे किमान १०० दिवस चालू शकते आणि सप्टेंबरपर्यंत लांबू शकते. ‘यूएस् सेंट्रल कमांड’ने पेंटागॉनकडे अधिक सैनिकी गुप्तचर अधिकार्‍यांची मागणी केली आहे, जेणेकरून इराणशी संबंधित कारवायांना दीर्घकाळ पाठबळ देता येईल. यावरून अमेरिकेने या संघर्षाचा कालावधी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आधी व्यक्त केलेल्या ४ आठवड्यांच्या अंदाजापेक्षा अधिक असू शकतो, असे गृहित धरून सिद्धता चालू केल्याचे संकेत मिळतात.

अमेरिकेला पश्चात्ताप करावा लागेल ! – युद्धनौका बुडवल्यानंतर इराणची धमकी

इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराघची

अमेरिकेने श्रीलंकेजवळ हिंद महासागरात इराणची युद्धनौका बुडवल्यावर  ‘अमेरिकेला तिच्या या कृत्याबद्दल पश्चात्ताप करावा लागेल’, अशी धमकी इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी दिली. ते म्हणाले की, इराणच्या किनार्‍यापासून २ सहस्र मैल दूर असलेल्या युद्धनौकेवर अमेरिकेने आक्रमण केले. ही नौका भारताच्या निमंत्रणावरून तेथे गेली होती. त्यात १३० खलाशी होते. कोणतीही पूर्वसूचना न देता आंतरराष्ट्रीय समुद्रात अमेरिकेने हा क्रूर आक्रमण केले. या आक्रमणात ८७ जण ठार झाले, तर अन्य घायाळ झाले.

इराणवरील आक्रमणांसाठी अमेरिकेकडून भारतीय बंदरांचा वापर होत असल्याचा दावा भारताने फेटाळला !

अमेरिकेच्या सैन्यातील निवृत्त कर्नल डग्लस मॅकग्रेगर यांनी ‘वन अमेरिका न्यूज नेटवर्क’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ‘आपले सर्व सैनिकी तळ उद्ध्वस्त झाले आहेत. आपले हार्बर इन्स्टॉलेशन (बंदरातील विविध यंत्रणा, क्रेन, किंवा सोयीसुविधांची केलेली मांडणी किंवा स्थापना) उद्ध्वस्त झाले आहेत. आपल्याला खरेतर भारत आणि भारतीय बंदर यांचा आधार घ्यावा लागत आहे, जे फार काही चांगले नाही. हेच नौदलाकडून सांगण्यात येत आहे’, असा दावा केला होता. यावर आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया व्यक्त करतांना ‘हा दावा खोटा आणि चुकीचा आहे. आम्ही तुम्हाला अशा निराधार आणि बनावट वक्तव्यांपासून सावध करतो’, असे म्हटले आहे.

भारतासाठी ९५ लाख बॅरल तेल पाठवण्यास रशिया सज्ज

मध्य-पूर्वेत तणाव वाढल्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतून कच्च्या तेलाच्या वाहतुकीचा मार्ग बंद झाला आहे. जागतिक ऊर्जा व्यापारासाठी हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग मानला जातो. या मार्गातून भारत सुमारे ५० टक्के तेल आयात करत होता. या पार्श्वभूमीवर रशिया भारताला कच्चे तेल पाठवण्यास सिद्ध झाला आहे. ‘रॉयटर्स’ वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार सध्या भारतीय सागरी क्षेत्राजवळील नौकांवर रशियाचे सुमारे ९५ लाख बॅरल कच्चे तेल उपलब्ध आहे आणि ते काही आठवड्यांत भारतात पोचवता येऊ शकते.

नौकांवरील तेल नेमके कुठे पाठवले जाणार होते, याविषयी स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही; मात्र आवश्यकता पडल्यास हे तेल भारताकडे वळवता येऊ शकते, असे सांगण्यात आले आहे. अहवालानुसार भारताकडे कच्च्या तेलाचा साठा सुमारे २५ दिवसांच्या मागणीसाठी पुरेसा आहे.

पाकविरोधात अफगाणिस्तान, इस्रायल आणि भारत एकत्र आले आहेत ! – पाकच्या संरक्षणमंत्र्यांचा दावा

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ

पाकिस्तानला एक प्रकारे घेरले जात आहे. एका बाजूला अफगाणिस्तान आहे, दुसर्‍या बाजूला भारत आहे आणि आणखी एका बाजूला इराण आहे. इस्रायल पाकिस्तानला स्वतःची कठपुतळी बनवू इच्छितो आणि या योजनेत भारतही सहभागी आहे, असा दावा पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी केला आहे. त्यांनी आरोप केला की, इराण युद्धामागे ज्यू आहेत आणि इस्रायलची सीमा पाकिस्तानपर्यंत आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

ख्वाजा आसिफ म्हणाले की, हा संपूर्ण घडामोडींचा क्रम पाकिस्तानसाठी गंभीर धोका आहे. पाकिस्तानविरुद्ध हा राजकीय आणि धार्मिक कट आहे. पाकिस्तानच्या नागरिकांनी हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. ज्यू मानवजातीसाठी धोका आहेत. पॅलेस्टाईनच्या भूमीवर इस्रायलची स्थापना झाल्यापासून इस्लामी जगावर आलेले प्रत्येक संकट हे ज्यू विचारसरणीचा परिणाम आहे.

अमेरिकेने कराची आणि लाहोर वाणिज्य दूतावासांतील काही कर्मचार्‍यांना परत बोलावले

पाकिस्तानमध्ये वाढत असलेल्या सुरक्षा धोक्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने कराची आणि लाहोर येथील अमेरिकी वाणिज्य दूतावासांमध्ये कार्यरत ‘गैर आपत्कालीन’ कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांना शक्य तितक्या लवकर पाकिस्तान सोडावे, असे निर्देश दिले आहेत. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे असलेल्या मुख्य अमेरिकी दूतावासाच्या कामकाजात कोणताही पालट करण्यात आलेला नाही आणि तेथील कर्मचारी सध्या तेथेच कार्यरत रहाणार आहेत. कराची येथील दूतावासाला काही दिवसांपूर्वी संतप्त लोकांनी आग लावली होती, तर लाहोर येथील दूतावासावरही आक्रमण करण्यात आले होते.

इराणच्या भूमिगत क्षेपणास्त्र तळांना लक्ष्य !

अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संघर्षात आता इराणमधील भूमिगत ‘मिसाइल सिटी’ अर्थात् क्षेपणास्त्रांचा साठा असलेले बोगदे यांना मोठ्या प्रमाणात लक्ष्य केले जात आहे. क्षेपणास्त्रे आणि ड्रोन या बोगद्यांमधून बाहेर पडताच प्रक्षेपण यंत्रणा नष्ट करत आहेत; तर बंकर बस्टर बाँबच्या साहाय्याने बोगद्यांच्या प्रवेशद्वारांवर आणि वरच्या संरचनांवर आक्रमणे केली जात आहेत. अमेरिकी कमांडरांच्या मते शेकडो क्षेपणास्त्रे, प्रक्षेपण यंत्रणा आणि ड्रोन नष्ट करण्यात आले असून ४ दिवसांत इराणच्या क्षेपणास्त्र आक्रमणांमध्ये सुमारे ८६ टक्के घट झाली आहे.

मध्य-पूर्वेतून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अमेरिकेच्या चार्टर्ड उड्डाणांना प्रारंभ

मध्य-पूर्व देशांतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने त्याच्या देशाच्या नागरिकांना येथून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी चार्टर्ड उड्डाणे प्रारंभ केली आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सांगितले की, संयुक्त अरब अमिरात, कतार, सौदी अरेबिया आणि इस्रायल यांमध्ये रहाणार्‍या अमेरिकी नागरिकांना साहाय्य केले जात आहे आणि आतापर्यंत १७ सहस्र ५०० पेक्षा अधिक अमेरिकी नागरिक येथून परतले आहेत. येत्या काही दिवसांत स्थलांतर मोहिम आणखी वेगाने राबवली जाणार आहे.

अमेरिकेला प्रतिदिन खर्च करावे लागत आहेत १ अब्ज डॉलर (८ सहस्र ३०० कोटी रुपये)

निवृत्त सैन्याधिकारी आणि ‘चिंतन रिसर्च फाऊंडेशन’चे सल्लागार कर्नल राजीव अग्रवाल यांच्या मते, प्राथमिक अंदाजानुसार ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’च्या कारवाईत अमेरिकेला प्रतिदिन सुमारे १ अब्ज डॉलर (८ सहस्र ३०० कोटी रुपये) खर्च करावे लागत आहेत. अमेरिकेचा संरक्षण अर्थसंकल्प सुमारे १ ट्रिलियन डॉलर (८३ लाख कोटी रुपये) असला, तरी समस्या एकूण खर्चाची नसून शस्त्रास्त्रांच्या प्रति युनिट किमतीची आहे. उदाहरणार्थ, अमेरिकेच्या ‘पॅट्रियट’ आणि ‘टॉमहॉक’ क्षेपणास्त्रांची किंमत सुमारे १० ते ३० लाख डॉलरपर्यंत (८ ते २४ कोटी रुपये) असते. त्याच्या तुलनेत इराणच्या सरासरी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची किंमत केवळ ८ लाख ते १० लाख डॉलर (साडेसहा ते ८ कोटी रुपये) इतकी आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेच्या ‘एमक्यू-९ रीपर’ ड्रोनची किंमत सुमारे ३ कोटी डॉलर (२४९ कोटी रुपये) आहे, तर इराणचा ‘शाहेद १३६’ ड्रोन केवळ ३० ते ५० सहस्र डॉलरमध्ये (२५ ते ४० लाख रुपयांत) सिद्ध होतो. या प्रचंड खर्चातील भेदामुळे अमेरिका आणि इस्रायल यांच्यासाठी हे युद्ध दीर्घकाळ चालू ठेवणे आर्थिकदृष्ट्या अत्यंत महाग ठरू शकते.

१९ लाख कोटी रुपयांचा फटका बसू शकतो

‘फॉर्च्यून’ नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात या युद्धाची एकूण आर्थिक किंमत अमेरिकेसाठी २१० अब्ज डॉलर, म्हणजेच १९ लाख कोटी रुपयांपर्यंत पोचू शकते. या आकड्यात थेट सैनिकी खर्चाचाही समावेश आहे, ज्याचा अंदाज सुमारे ९५ अब्ज डॉलर, म्हणजे ८७ सहस्र ४९८ कोटी रुपयांपर्यंत लावण्यात आला आहे. याखेरीज  जागतिक स्तरावर व्यापार, ऊर्जा बाजारपेठ आणि आर्थिक परिस्थिती यांमध्ये निर्माण झालेल्या मोठ्या अडथळ्यांमुळे होणारी आर्थिक हानीही या अंदाजात समाविष्ट करण्यात आले आहे.

अमेरिका ३० कोटी रुपयांच्या क्षेपणास्त्राने ३० लाख रुपयाचे ड्रोन पाडत आहे

युद्धात इराणी ड्रोन पाडण्यासाठी अमेरिका ‘पॅट्रियट पीएसी-३’ या इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांचा वापर करत आहे. एका इराणी ड्रोनची किंमत सुमारे ३० लाख रुपये आहे, तर पॅट्रियट पीएसी-३ क्षेपणास्त्राची किंमत सुमारे ३० कोटी रुपये आहे. जर ड्रोन पाडला नाही, तर त्यामुळे वायूदलाचे तळ, तेल शुद्धीकरण कारखाने, वीज प्रकल्प किंवा इतर महत्त्वाच्या पायाभूत सुविधा यांची मोठी हानी होऊ शकते. यासाठी महागड्या क्षेपणास्त्रांचा वापर आवश्यक आहे; कारण मोठ्या आक्रमणांत अब्जावधी रुपयांची हानी होऊ शकते.

अमेरिका आणि इस्रायल यांच्या क्षेपणास्त्रांच्या संख्येत घट

युद्ध प्रारंभ झाल्यानंतर ४ दिवसांतच अमेरिका आणि इस्रायल यांच्या क्षेपणास्त्र साठ्यावर ताण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अंदाजानुसार युद्धक्षेत्रात ‘पॅट्रियट’विरोधी (इंटरसेप्टर) क्षेपणास्त्रांची संख्या सुमारे ६०० ते ८०० एवढी आहे. एका क्षेपणास्त्राला अडवण्यासाठी ४ ते ६ इंटरसेप्टर क्षेपणास्त्रे डागली जातात. आतापर्यंत सुमारे १५० ते २०० इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांचा वापर झाला आहे. जर याच वेगाने आक्रमणे चालू  राहिली, तर पुढील ४ ते ७ दिवसांत त्यांची उपलब्धता संकटात येऊ शकते. काही वृत्तांनुसार अमेरिका जपान आणि दक्षिण कोरिया येथून काही पॅट्रियट क्षेपणास्त्रे आणण्याचा विचार करत आहे. दुसरीकडे इराणकडे क्षेपणास्त्रे आणि ड्रोन यांचा मोठा साठा असल्याचे सांगितले जाते. विविध अंदाजांनुसार इराणकडे २० सहस्र ते ५० सहस्रांपर्यंत विविध प्रकारची क्षेपणास्त्रे असू शकतात. याखेरीज सहस्रोंच्या संख्येने ड्रोनही उपलब्ध आहेत; ज्यांना अनेक डोंगरांच्या आत सिद्ध केलेल्या भूमिगत तळांमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहेत.

अझरबैजानवर इराणी ड्रोन पडल्याने इराणच्या राजदूताला बोलावले !

अझरबैजानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, त्यांच्या हद्दीत ड्रोन पडल्याच्या घटनेबद्दल इराणी राजदूताला बोलावण्यात आले आहे. या आक्रमणामुळे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन झाले आहे. इराणने तातडीने या प्रकरणाचे स्पष्टीकरण द्यावे आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत. या प्रकरणात प्रत्युत्तरात्मक उपाययोजना करण्याचा अधिकार अझरबैजान राखून ठेवतो.