महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाकडून मुंबईत ३ ठिकाणी धाडी

  • ‘इस्लामिक स्टेट’च्या ऑनलाईन कट्टरतावादी प्रचाराला आळा घालण्याचा प्रयत्न

  • स्मार्टफोन, सीमकार्ड, भ्रमणसंगणक आणि हार्डडिस्क जप्त

मुंबई – इस्लामिक स्टेटच्या वाढत्या ऑनलाईन कट्टरतावादी प्रचाराला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने कारवाई केली आहे. मुंबईतील कुर्ला आणि गोवंडी या परिसरांतील एकूण ३ ठिकाणी पथकाने एकाच वेळी धाडी घातल्या. या प्रकरणी अद्याप कुणाला अटक केल्याची अधिकृत घोषणा पथकाने केलेली नाही.

केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून पथकाला काही माहिती मिळाली होती. काही तरुण ‘डिजिटल’ माध्यमाचा, विशेषतः ‘एन्क्रिप्टेड मेसेजिंग अ‍ॅप्स’चा (गोपनीय पद्धतीने संदेशांची देवाण-घेवाण करता येणार्‍या अ‍ॅप्स’चा) वापर करून ‘इस्लामिक स्टेट’ अर्थात् ‘इसिस’च्या कट्टरपंथी विचारसरणीचा प्रसार करत असल्याचा संशय यंत्रणांना होता. त्याची निश्‍चिती करून पथकाने संशयास्पद ठिकाणांची नाकाबंदी करून धाडी घातल्या.  यात संशयितांकडून वरील तांत्रिक आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत.

संशयित व्यक्ती कोणत्या माध्यमातून विदेशी हस्तकांच्या संपर्कात होत्या ?, याची माहिती आता ‘फॉरेन्सिक’ चाचणीतून उघड होईल. जप्त केलेली सर्व उपकरणे फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहे. त्यातून डिलीट केलेली (पुसून टाकलेली) माहिती पुनर्प्राप्त करण्याचे काम चालू आहे.