बार्शी शहर (जिल्हा सोलापूर) भोंगे आणि ध्वनीक्षेपक यांपासून मुक्त !

मशिदीवरील भोंगे काढतांना

बार्शी – शहरातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात विशेष मोहीम राबवली. यामध्ये २२ भोंगे आणि ध्वनीक्षेपक काढण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत ८ मशिदी आणि ५ मंदिरे यांवरील भोंग्यांवर ही कारवाई करण्यात आली.

मंदिरांवरील भोंगे काढतांना

काही दिवसांपूर्वी दोन गटांतील दगडफेकीच्या घटनेनंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी शांतता समितीची बैठक घेऊन सामोपचाराने प्रश्न सोडवला आणि नियमबाह्य भोंगे काढण्याच्या सूचना दिल्या. (भोंगे काढण्यासाठी पोलिसांना एवढा अवधी का लागला ? पोलीस एखादी घटना घडल्यानंतरच कारवाई करणार का ? – संपादक) २८ फेब्रुवारी या दिवशी बारंगुळे प्लॉट, मंगळवार पेठ, खाजानगर, अमन चौक आणि एकविरा चौक आदी भागांतील धार्मिक स्थळांची पडताळणी करण्यात आली. पडताळणीच्या वेळी १४ मशिदींपैकी ८ मशिदींवरील १४ भोंगे आणि ५ मंदिरांवरील ८ भोंगे काढण्यात आले. ही कारवाई शांततेत पार पडली असून ‘यापुढे ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल’, अशी सूचना पोलिसांनी दिली आहे.