‘फाल्गुन पौर्णिमा (३.३.२०२६, मंगळवार) या दिवशी असणारे खग्रास चंद्रग्रहण हे भारतात ग्रस्तोदित दिसणार आहे. ग्रस्तोदित, म्हणजे ग्रस्त असलेले चंद्रबिंब उदयास आलेले दिसेल. भारतात कुठेही या ग्रहणाचा स्पर्श आणि मध्य दिसणार नाही. गुजरातमधील राजकोट, वेरावळ, पोरबंदर, जामनगर, जुनागढ, गांधीधाम या प्रदेशांत सायंकाळी ६.४८ वाजल्यानंतर सूर्यास्त होत असल्याने या प्रदेशांत हे ग्रहण दिसणार नाही. त्या प्रदेशांत रहाणार्या व्यक्तींनी ग्रहणाचे कोणतेही नियम पाळू नयेत.

१. ग्रहण दिसणारे प्रदेश
‘भारतासह पूर्व आशिया, जपान, रशियाचा मध्य आणि पूर्व प्रदेश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, संपूर्ण अमेरिका, कॅनडा, ग्रीनलँड, दक्षिण अमेरिका आणि अंटार्क्टिकाचा काही प्रदेश’ येथे हे चंद्रग्रहण दिसेल.
२. ग्रहणाचे वेध लागणे
२ अ. अर्थ : चंद्रग्रहणापूर्वी चंद्र सूर्याच्या छायेत येऊ लागतो. त्यामुळे त्याचा प्रकाश हळूहळू न्यून होण्यास आरंभ होतो. यालाच ‘ग्रहणाचे वेध लागले’, असे म्हणतात.
२ आ. ग्रहण वेधारंभ : हे ग्रहण ग्रस्तोदित असल्याने मंगळवार, ३ मार्च २०२६ या दिवशीच्या सूर्याेदयापासून ग्रहण मोक्षापर्यंत (सायंकाळी ६.४८ वाजेपर्यंत) ग्रहणाचे वेध पाळावेत. बाल, वृद्ध, आजारी, अशक्त व्यक्ती आणि गर्भवती स्त्रिया यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजल्यापासून ग्रहण मोक्षापर्यंत ग्रहणाचे वेध पाळावेत. वेधकाळात स्नान, देवपूजा, जपजाप्य, श्राद्ध ही कर्मे करता येतात. वेधकाळात भोजन करणे निषिद्ध आहे; मात्र वेधकाळात इतर आवश्यक असे पाणी पिणे, मल-मूत्रोत्सर्ग करणे, झोप घेणे ही कर्मे करता येतात. ग्रहण पर्वकाळात (सूत्र क्रमांक ‘३ ऊ’ मध्ये अर्थ दिला आहे.) म्हणजे आपल्या गावातील सूर्यास्तापासून ग्रहण मोक्षापर्यंत (सायंकाळी ६.४८ वाजेपर्यंत) या काळात पाणी पिणे, मल-मूत्रोत्सर्ग ही कर्मे करू नयेत.
३. चंद्रग्रहणाच्या वेळा (भारतीय प्रमाण वेळेनुसार)

३ अ. स्पर्श (आरंभ) : दुपारी ३.२० वाजता
३ आ. संमीलन (conjunction) : सायंकाळी ४.३४ वाजता
३ इ. मध्य : सायंकाळी ५.०४ वाजता
३ ई. उन्मीलन (opposition) : सायंकाळी ५.३३ वाजता
३ उ. मोक्ष (शेवट) : सायंकाळी ६.४८ वाजता
३ ऊ. ग्रहणपर्व (टीप १) (ग्रहणाच्या आरंभापासून समाप्तीपर्यंतचा एकूण कालावधी) : ३ घंटे २८ मिनिटे.
(वरील सर्व वेळा संपूर्ण भारतासाठी आहेत.)
टीप १ : पर्व म्हणजे पर्वणी किंवा पुण्यकाल होय. ग्रहण स्पर्शापासून ग्रहण मोक्षापर्यंतचा काल पुण्यकाल आहे. ‘या काळात ईश्वरी अनुसंधानात राहिल्यास आध्यात्मिक लाभ होतो’, असे शास्त्रात सांगितले आहे.’
४. ग्रहणाचे राशीपरत्वे फल
४ अ. शुभ फल : मिथुन, तुला, वृश्चिक आणि मीन
४ आ. अशुभ फल : वृषभ, सिंह, कन्या आणि मकर
४ इ. मिश्र फल : मेष, कर्क, धनु आणि कुंभ
ज्या राशींना अशुभ फल आहे, त्या राशीच्या व्यक्तींनी आणि गर्भवती महिलांनी हे ग्रहण पाहू नये.’
(साभार : दाते पंचांग)
५. ग्रहणकालात कोणती कर्मे करावीत ?
अ. ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे.
आ. पर्वकालामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम आणि दान करावे.
इ. पूर्वी काही कारणाने खंडित झालेल्या मंत्राच्या पुरःश्चरणाचा आरंभ या कालावधीत केल्यास त्याचे फळ अनंत पटींनी मिळते.
ई. ग्रहणकालात (पर्वकालात) झोप, मल-मूत्रोत्सर्ग, अभ्यंग, भोजन आणि कामविषयसेवन ही कर्मे करू नयेत.
६. ग्रहणमोक्षानंतर (ग्रहण संपल्यानंतर) स्नान करावे.
एखाद्या व्यक्तीला अशौच असल्यास ग्रहणकालात ग्रहणासंबंधी स्नान आणि दान करण्यापुरती तिला शुद्धी असते.
७. ग्रहणकालात काय वर्ज्य करावे ?
अ. ग्रहणकाळात भोजन करणे निषिद्ध आहे; म्हणून अन्नपदार्थ खाऊ नयेत. ग्रहण लागण्यापूर्वी शिजवलेले अन्न नंतर वापरू नये; कारण घातक उत्सर्जित किरणे त्या अन्नाद्वारे शोषली जाऊ शकतात.
आ. ग्रहणकाळ हा साधनेसाठी उत्तम असल्याने त्या काळात झोप घेऊन तमोगुण वाढवण्यापेक्षा साधना करून या काळाचा लाभ करून घ्यावा.
इ. ग्रहणकाळात करमणूक आणि ऐषाराम यांत वेळ वाया घालवू नये; कारण साधकांसाठी ही अमूल्य संधी आहे. या काळात केलेल्या साधनेचे (जप, ध्यान आणि प्रार्थना केल्याचे) फळ अनंत पटीने मिळते. यासाठी या काळात उपास्यदेवतेचे किंवा आपल्या गुरुचरणांचे मनोभावे स्मरण करून एकाग्रतेने नामजप करावा.’
– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. (२४.२.२०२६)
हिंदु राष्ट्राच्या दृष्टीने आगामी काळ आणि संघटितपणे वेगाने करावयाचे प्रयत्न !
तिसरे जागतिक महायुद्ध
ज्योतिषशास्त्राची अपकीर्ती : वैज्ञानिक अज्ञान कि वैचारिक आतंकवाद ?
‘अधिक मासा’चे महत्त्व, या काळात करायची व्रते आणि पुण्यकारक कृती अन् त्या करण्यामागील शास्त्र !
साधकांना ज्योतिषशास्त्राच्या संदर्भात सेवा करण्यासाठी दिशा देऊन त्याद्वारे त्यांची साधना करून घेणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
सामाजिक चेतनेत होणारे परिवर्तन आणि त्यामुळे उद्भवणारा आगामी आपत्काळ, यासंबंधी ज्योतिषशास्त्रीय विवेचन