‘आचार्य’ मानल्या जाणार्‍या शिक्षकांना कुत्रे मोजण्याचे काम देणे हा त्यांचा अवमानच !

  • शिक्षकांच्या अशैक्षणिक कामांवरून आमदार विक्रम काळे आक्रमक !

  • शिक्षकांना श्वान मोजण्याचे आदेश न दिल्याची राज्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती !

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे विधान परिषदेत संताप व्यक्त करतांना

मुंबई, २४ फेब्रुवारी (वार्ता.) – आपण शिक्षकांना ‘आचार्य’ मानतो, त्यांना समाजात मानाचा दर्जा देतो; मात्र दुसरीकडे त्यांच्याकडून कुत्रे मोजण्यासारखी कामे करून घेतो, हे अत्यंत संतापजनक आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांनी विधान परिषदेत संताप व्यक्त केला. शिक्षकांवर लादल्या जाणार्‍या अशैक्षणिक कामांच्या ओझ्यावरून त्यांनी २४ फेब्रुवारी या दिवशी तारांकित प्रश्नाद्वारे शासनाला धारेवर धरले. यावर उत्तर देतांना राज्यमंत्री पंकज भोयर यांनी ‘शिक्षकांना श्वान मोजण्याचे कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत’, असे स्पष्ट केले.

राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले की, प्रशासकीय सुलभतेसाठी उपाययोजना चालू आहेत. शाळेच्या परिसरात कुंपण असावे, खाद्यपदार्थ उघडे पडू नयेत आणि स्वच्छतेची काळजी घ्यावी, इतकेच दायित्व त्यांना दिले आहे. जनगणना, आपत्ती निवारण आणि निवडणुकांची कामे शिक्षकांनी करणे अनिवार्य आहे.

सदस्य विक्रम काळे म्हणाले की, राज्यातील शिक्षक संघटना आणि लोकप्रतिनिधी वारंवार शासनाकडे पाठपुरावा करत आहेत की, शिक्षकांकडील अशैक्षणिक कामे अल्प करावीत आणि त्यांना केवळ विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम द्यावे. निवडणुका असोत, मतदार सूची दुरुस्ती असो, स्वच्छतागृहांची मोजदाद असो किंवा इतर कोणतेही सर्वेक्षण असो, प्रत्येक वेळी शिक्षकांचाच आधार घेतला जातो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. शासनाकडे विविध यंत्रणा आणि कर्मचारी असतांनाही शिक्षकांनाच वारंवार कामे का दिली जातात ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात शिक्षकांना शिकवण्याव्यतिरिक्त अन्य कामे दिली जाणार नाहीत, असे आश्वासन दिले होते; मात्र प्रत्यक्षात परििस्थती गंभीर आहे. एका शाळेत ६० शिक्षक असतील, तर त्यातील ४५ जणांना निवडणुकीच्या कामाला जुंपले जाते. उरलेल्या १५ शिक्षकांवर २ सहस्र विद्यार्थ्यांचा भार येतो. अशाने शिक्षणाचा दर्जा कसा टिकणार ? शिक्षकांनी कामाला नकार दिला किंवा तक्रार केली, तर जिल्हाधिकार्‍यांकडून गुन्हे नोंदवण्याची भीती दाखवली जाते. हे अन्यायकारक आहे.