
अमेरिकेमध्ये वार्षिक २ कोटी ९० लाख रुपये वेतन, स्थिर नोकरी, कर्जमुक्त घर आणि अत्युच्च जीवनमान, अशी जीवनशैली असतांनाही एका अनिवासी भारतियाने भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व सुखे पायांशी लोळण घेत असतांनाही त्यांचा त्याग करून भारतात परतणे, हे निश्चितच वैशिष्ट्यपूर्ण आणि भारतासाठी अभिमानास्पद आहे. भारतातील अनेक तरुण-तरुणी शिक्षण चालू असतांनाच नंतर विदेशात जाण्याची स्वप्ने पहातात. ‘कधी एकदा आपण उच्च शिक्षणासाठी विदेशात जातो आणि तेथे स्थायिक होतो’, अशी मनीषा ते बाळगून असतात. भारतीय तरुण पिढीच्या या मानसिकतेमुळे विदेशात जाणे म्हणजे आज ‘स्टेटस’च मानले जाते. ‘विदेशात गेलो म्हणजे आता आपले आयुष्य स्थिरस्थावर झाले’, अशी अनेकांची समजूत असते. त्यामुळे प्रत्येक जण विदेशगमनासाठी धडपडत असतो. प्रारंभी हे सर्व आकर्षक, आरामदायी आणि सुखकर वाटते; परंतु हळूहळू नेहमीचे रहाटगाडगे चालू होते आणि मग आठवण येते ती भारताची ! विदेशात जातांना आपले घर, कुटुंब आणि नातेवाईक यांचा त्याग करावा लागत असल्याने ते अनुभवता येत नसल्याची सल कायमची मनात रहाते. या प्रश्नांविषयी बोलायचे कुणाकडे ? दिवसभर नोकरी करून घरी आल्यावर घर खायला उठते, तो एकटेपणा कसा दूर करायचा ? प्रतिदिन काळजी घेणार्या आई-वडिलांची माया पुन्हा कधी अनुभवता येणार ? मुले भारतात रहात असल्यास त्यांच्या संगोपनातील आनंद कसा घ्यावा ? आदी अनेक प्रश्नांचा भडीमार होत असतो. यश जरी चकाकत किंवा झळकत असले, तरी त्यामागील ही दुखरी बाजू दुर्लक्षित करून चालत नाही. त्यासाठी मार्ग काढावाच लागतो.
अनिवासी भारतियाने सांगितले, ‘‘मी भारतात परतत आहे; कारण माझ्यासाठी पैशांपेक्षा कुटुंब महत्त्वाचे आहे. मुलांनी आजी-आजोबांसमवेत वाढावे, मुलांवर भारतीय संस्कार व्हावेत, अशी माझी इच्छा आहे.’’ त्यांचे हे विधान प्रत्येकच भारतियाला विचार करायला लावणारे आदर्शवत आहे. विदेशात स्थायिक झालेले किती भारतीय असा विचार करतात ? भारतीय संस्कारांचे मोल भारतात असतांना नव्हे, तर विदेशात गेल्यावरच समजते, ही खरेतर दुर्दैवाची गोष्ट आहे; पण प्रत्येकानेच आता शहाणे होण्याची आवश्यकता आहे. भारतातून विदेशात जाणार्यांनी अनिवासी भारतियाच्या विधानांचा गांभीर्याने विचार करावा आणि विदेशात जाणे आवश्यक नसल्यास ते टाळून भारतातच रहाण्याचा मार्ग विनासायास स्वीकारावा. यातच प्रत्येकाचे हित आहे. जे भारत देऊ शकतो, ते अन्य कोणताही देश देऊ शकत नाही, हे लक्षात घ्या; कारण केवळ भारत विश्वगुरु आहे. त्यामुळे भारतातून पाऊल बाहेर टाकण्यापूर्वी तरुण पिढीने विचार करावा.
संतुलित जीवनशैली !
अनिवासी भारतियाचा ‘धाडसी निर्णय’ म्हणत काहींनी त्याचे कौतुक केले. त्याने कुटुंबाला प्राधान्य दिल्यामुळे काहींनी त्याचे समर्थन केले, तर काहींनी त्याला अव्यवहारी म्हणत टीका केली. अनेकांना हा निर्णय अविवेकी वाटला. जीवनात सर्वच निर्णय आर्थिक बाजूने तोलता येत नाहीत, हेही तितकेच खरे आहे. प्रसंगी कुटुंबाचाही विचार करावाच लागतो. टीका करणार्यांचे म्हणणे काय ? तर भारतात काय ठेवले आहे ? या टीकाकारांनी सामाजिक माध्यमांद्वारे जीवनमानातील विसंगतीवर चर्चा केली. त्यांच्या मते भारतात प्रदूषण, गुन्हेगारी, बेशिस्तपणा, शिक्षणव्यवस्थेत त्रुटी, प्रशासकीय अडचणी हेच आहे; मात्र आमच्या देशात असे नाही. त्यामुळे परदेशातील जीवन अधिक सुरक्षित आणि सोयीसुविधायुक्त आहे. हे केवळ टीकाकार नव्हेत, तर भारताविषयी असूया आणि द्वेष बाळगणारे राष्ट्रद्वेषीच आहेत. त्यांच्या टीकांकडे लक्ष न देता मनुष्यजन्मात जे करणे अपेक्षित आहे, त्याकडे वाटचाल करणे अधिक महत्त्वाचे आहे.
विदेशातील जीवनाचे कितीही गोडवे गायले, तरी तेथे भारताप्रमाणे कुटुंबसंस्कृती, सांस्कृतिक बांधीलकी, सामाजिक आधार, धार्मिक जीवनशैली ही जीवनमूल्ये अस्तित्वात नसतात. भारत त्यात उजवा ठरतो. आजच्या वेगवान जीवनात कामाचे संतुलन राखणे महत्त्वाचे ठरते; पण त्याच्या जोडीला जीवनशैली ताणयुक्त असेल, तर काय उपयोग आहे ? वैयक्तिक आयुष्याकडे दुर्लक्ष करणार्यांना आयुष्याच्या एका टप्प्यावर संतुलित आयुष्याचे महत्त्व पटू लागते. त्यामुळेच तर असे लोक भारताची वाट धरू लागतात. ‘वेतन अल्प असले, तरी चालेल; पण माझे आयुष्य मी समाधानाने जगेन’, असे ते ठरवतात. भारतात रहाण्याचा लाभ लक्षात आल्यावरच अनेक जण भारतात परतण्याचा निर्णय घेतात. मानसिक समाधान मिळवणे, सामाजिक आधार आणि आप्तजनांसमवेत रहाण्याचा आनंद यांचे मूल्य करणे कठीण आहे. हे सर्वकाही भारतातच सहजगत्या मिळू शकते; म्हणूनच तर भारत भाग्यविधाता आहे.
पुन्हा एकदा भारताची निवड !
भारताने अनेक दशकांपासून ‘ब्रेन ड्रेन’चा (बौद्धिक पलायनाचा) अनुभव घेतला होता. काही दशकांपूर्वी विदेशगमनाची मोठी लाटच आली होती; पण सध्याच्या काळात भारतात स्थलांतरित होणार्यांचे प्रमाण वाढले आहे; कारण भारतही आता सर्वच क्षेत्रांत कात टाकत आहे. भारतातील वाढते उद्योग, वाढती अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञान क्षेत्रांतील सुवर्णसंधी यांमुळे अनेक विदेशी भारतीय हे पुन्हा एकदा भारताचा विचार करू लागले आहेत. साधारणतः ६० टक्के अनिवासी भारतीय भारतात परत येत असल्याची आकडेवारी उपलब्ध आहे. येथे आपण एका अनिवासी भारतियाचे उदाहरण पाहिले; पण ते प्रातिनिधिक आहे. अशा प्रकारे सर्वच स्तरांवर व्यापक सामाजिक पालट होत आहे. ‘विदेश म्हणजेच प्रगती’ हे समीकरण पालटत आहे. ‘भारत म्हणजे विकास’ हे समीकरण दृढ होत आहे. ही गौरवशाली भारतासाठी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणावी लागेल. ही काळाची पावले भारताला आणखी भरारी घेण्यास उद्युक्त करणारी आहेत.

आजच्या पिढीसमोर नोकरी आणि व्यवसाय यांच्या असंख्य संधी आहेत; परंतु जीवनातील संतुलन राखणे अधिक आव्हानात्मक झाले आहे. पैशांच्या शर्यतीत माणूस स्वतःला आणि आपल्या नात्यांना हरवू लागला, तर त्या यशाला अर्थच काय ? अनिवासी भारतियाच्या निर्णयाकडे केवळ वैयक्तिक निर्णय म्हणून न पहाता तो पालटणार्या भारतीय समाजाचा आरसाच म्हणावा लागेल. डॉलरपेक्षा कुटुंबसंस्कृतीला निवडणे, हीच भारतीयत्वाची ओळख आहे. खरा भारतीय तोच, ज्याला ही जीवनमूल्ये समजली आणि समजल्यावर त्याने ती आचरणात आणली. जीवनाकडे कसे पहायला हवे, याची नवदृष्टी या उदाहरणातून मिळते. ‘आपण भारतीय आहोत आणि भारतीयच राहू’, असा प्रत्येकाने संकल्प करावा. भारताने जे आपल्याला दिले, ते भारतातच राहून वृद्धींगत करण्याचा निश्चय करूया आणि याद्वारेच भारतमातेचे पांग फेडूया !
| जे भारत देऊ शकतो, ते कोणताही देश देऊ शकत नाही. त्यामुळे ‘विश्वगुरु’ भारतातून पाऊल बाहेर टाकण्यापूर्वी विचार करा ! |
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव
Vande Mataram : बंगालमधील मदरशांमध्ये ‘वन्दे मातरम्’ अनिवार्य करण्यावर ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चा आक्षेप
Bhopal University Renaming : बरकतउल्ला विद्यापिठाचे नाव ‘वाग्देवी भोजपाल विद्यापीठ’ होणार !