सोलापूर, धाराशिव, बीड आणि लातूर जिल्ह्यांत महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने विविध ठिकाणी सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन !

सोलापूर येथ लोकप्रतिनिधींच्या हस्ते प्रदर्शनांचे उद्घाटन

सोलापूर – महाशिवरात्रीचे औचित्य साधून सनातन संस्थेच्या वतीने सोलापूर जिल्ह्यामध्ये ५०, बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ येथे आणि लातूर जिल्ह्यात २, धाराशिव जिल्ह्यात ६ ठिकाणी  सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सोलापूरमधील चौपाड येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरामध्ये भाजपचे आमदार श्री. विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रदर्शन पाहून ‘पुष्कळ छान प्रदर्शन लावले आहे’, असा अभिप्राय त्यांनी दिला, तसेच या प्रदर्शनाला सोलापूर महानगरपालिकेचे महापौर श्री. विनायक कोंड्याल आणि त्यांच्या पत्नी यांनीही भेट दिली. प्रदर्शन पाहून ‘पुष्कळ छान उपक्रम आहे’, असे मत त्यांनी व्यक्त केले.

विजापूर रोड येथील श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर येथे उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी देवकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले, याप्रसंगी त्यांचे पती श्री. महेश देवकरही उपस्थित होते. प्रदर्शन पाहून ‘प्रदर्शन पुष्कळ सुंदर लावले आहे’, असा अभिप्राय त्यांनी दिला, तसेच या प्रदर्शनाला भाजपच्या नगरसेविका सौ. चैताली शिवराज गायकवाड आणि त्यांचे पती श्री. शिवराज गायकवाड यांनीही भेट दिली. प्रदर्शन पाहून, ‘असे उपक्रम आपल्या भागात राबूया’, असे ते म्हणाले.

अक्कलकोट रोड येथील वीरतपस्वी प्रशाला परिसरातही प्रदर्शनास मोठा प्रतिसाद मिळाला, तसेच बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे ‘सनातन प्रभात’चे वाचक, हितचिंतक आणि प्रसिद्ध उद्योजक श्री. निळकंठ चाटे यांच्या शुभहस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन झाले. लातूर जिल्ह्यातही २ ठिकाणी अशा प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते.

भाविकांना सण-उत्सवांचे शास्त्र समजावे, तसेच राष्ट्र आणि धर्म या विषयांवरील ग्रंथांचा लाभ व्हावा, या उद्देशाने लावण्यात आलेल्या या प्रदर्शनांना भाविकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनांमध्ये धर्मशिक्षण, बालसंस्कार, साधना, हिंदुत्व, आयुर्वेद, राष्ट्ररक्षण इत्यादी विषयांवरील अनमोल ग्रंथसंपदा आणि सात्त्विक उत्पादने उपलब्ध करून देण्यात आली होती. महाशिवरात्रीच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमामुळे भाविकांना आध्यात्मिक ज्ञानाचा लाभ घेण्याची संधी मिळाली.

सोलापूरच्या उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी देवकर आणि समवेत त्यांचे पती श्री. महेश देवकर सनातनचे प्रदर्शन न्याहाळतांना
सोलापूरचे महापौर श्री. विनायक कोंड्याल आणि त्यांच्या पत्नी यांची ग्रंथप्रदर्शनाला भेट
श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर (विजापूर रोड ): येथे सोलापूर येथील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका सौ. चैताली शिवराज गायकवाड यांचे पती शिवराज गायकवाड. (उजवीकडे)

क्षणचित्र

सोलापूर येथे होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या निमित्ताने सर्व भाविकांना निमंत्रण देण्यात आले, तसेच ‘सेल्फी पॉईंट’वर (भ्रमणभाषमध्ये स्वतःचे छायाचित्र स्वतः काढण्यासाठी सिद्ध केलेले ठिकाण) भाविक छायाचित्र काढत होते.