पुणे येथे केवळ १५ दिवसांत २० अल्पवयीन मुली बेपत्ता !

  • ‘व्हॅलेंटाईन डे’च्या एकाच दिवशी ३ अल्पवयीन मुली घरातून निघून गेल्या

  • पालकांनी मुलींवर लक्ष ठेवण्याचा पोलिसांचा सल्ला

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – शहरात अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याच्या घटनांनी गंभीर स्वरूप धारण केले आहे. १ ते १५ फेब्रुवारी या पंधरवड्यात २० मुलींच्या अपहरणाच्या घटना घडल्या आहेत. या मुली प्रामुख्याने १३ ते १७ वर्षांच्या आहेत. सामाजिक माध्यमांवरील ओळखी, प्रेमाचे आमीष, लग्नाचे आश्वासन आणि ओळखीच्या व्यक्तींचा सहभाग ही या घटनांमागील प्रमुख कारणे आहेत. अशा घटनांमध्ये अनेकदा प्रेमसंबंधाचे आमीष दाखवून शारीरिक शोषणाचे प्रकारही घडत आहेत. ‘व्हॅलेंटाइन डे’ला म्हणजेच १४ फेब्रुवारीला ३ अल्पवयीन मुली घरातून निघून गेल्याच्या घटना घडल्या आहेत.

नांदेड सिटी, सहकारनगर, बिबवेवाडी, स्वारगेट परिसर, काळेपडळ, वाघोली, लोणीकंद, कात्रज, वारजे माळवाडी, येवलेवाडी, चंदननगर, बाणेर, कोथरूड, विश्रामबाग, भारती विद्यापीठ परिसर, मुंढवा, अलंकार पोलीस ठाण्याची हद्द, खराडी आणि चतु:शृंगी आदी भागांतून अल्पवयीन मुली पळवून नेण्याच्या घटना घडल्या आहेत.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी सांगितले की, भावनिक फसवणूक आणि ‘सेक्सॉर्टशन’ (एखाद्या व्यक्तीचे खाजगी किंवा अश्लील छायाचित्रे/व्हिडिओ वापरून त्याला धमकावून पैसे, लैंगिक कृती किंवा इतर काही मागणे) यांसारखे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे पालकांनी मुला-मुलींच्या भ्रमणभाष वापरावर सजगपणे लक्ष ठेवणे आणि त्यांच्याशी मोकळा संवाद वाढवणे अत्यावश्यक आहे.

संपादकीय भूमिका

  • हे आहेत ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्याचे, तसेच मुलींवर लहानपणापासून संस्कार न केल्याचे दुष्परिणाम !
  • अनेक गोष्टींमध्ये पाश्चात्त्यांचे अंधानुकरण केल्यामुळे मुलांना योग्य काय आणि अयोग्य काय याची जाण नसणे, हे गंभीर आहे !