नवीन कातळशिल्पांचा शोध आणि संशोधन होणार !

मुंबई, १२ फेब्रुवारी (वार्ता.) – कोकणातील कातळशिल्पांचा शोध घेण्यासाठी आणि त्या विषयीचे संशोधन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘वर्ल्ड हेरिटेज डेस्क’ (जागतिक वारसा मंच) स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कातळशिल्पांचा शोध घेऊन त्याविषयीची कागदपत्रे सिद्ध करण्याचे काम हा डेस्क करणार आहे. मुंबई आणि रत्नागिरी या २ ठिकाणी याच्या शाखा असणार आहेत. यासाठी १४ कोटी ६२ लाख ३२ सहस्र ६७१ रुपये इतका निधी शासनाकडून संमत करण्यात आला आहे. या डेस्कला पुढील ६ मासांत याविषयीचा अहवाल शासनाला सादर करावयाचा आहे.
भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील कातळशिल्पांवरील साहित्याचा सखोल आढावा घेणे, ऐतिहासिक नकाशे, उपग्रहाद्वारे घेतलेल्या प्रतिमा, अभिलेखीय साहित्य यांचा अभ्यास करणे, कातळशिल्पांचा माहितीकोष सिद्ध करणे, कातळशिल्पांचे सर्वेक्षण, नोंदणी, वर्गीकरण आणि संवर्धनासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करणे अन् त्याविषयीचा अहवाल सादर करणे आदी कामे वर्ल्ड हेरिटेज डेस्कच्या मुंबई शाखेकडून केली जाणार आहेत. घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष सर्वेक्षण, नकाशांकन, छायाचित्रण, ड्रोनद्वारे चित्रीकरण, क्षेत्राच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक संदर्भांचा अभ्यास, स्थानिक परंपरा, लोककथा अन् ठिकाणाचे नाव यांचे संकलन, स्थळाची स्थिती आणि धोके यांचा अभ्यास आणि संरक्षणासाठी प्राथमिक शिफारसी देणे, स्थानिक नागरिकांची संवाद, जनजागृती, स्थानिकांच्या सहभागाने माहिती घेणे ही कामे डेस्कच्या रत्नागिरी शाखेकडून केली जाणार आहेत.
‘वर्ल्ड हेरिटेज डेस्क’ची स्थापना !भारतीय पुरातत्व विभागाकडून कोकणातील कातळशिल्पांना जागतिक वारसा म्हणून नामांकन प्राप्त व्हावे, यासाठीचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवण्यात आला आहे. त्या दृष्टीने या कातळशिल्पांचे संशोधन ‘वर्ल्ड हेरिटेज डेस्क’द्वारे केले जाणार आहे. कोकण किनारपट्टी आणि पठार यांवर आढळून आलेली १ सहस्रांहून अधिक कातळशिल्पे आद्यऐतिहासिक मानव आणि तो काळ समजून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत. त्यांच्या अभ्यासपूर्ण संशोधनातून सहस्रावधी वर्षांपूर्वींची मानवसंस्कृती समजून घेण्यासाठी या शिल्पांचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरणार आहे. |
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
गडचिरोलीतील खाण प्रकल्प रहित करावेत ! – आदित्य ठाकरे, नेते, ठाकरे गट