General Naravane Book : जनरल मनोज नरवणे यांचे आत्मचरित्र पुस्तक प्रकाशितच झालेले नाही !

  • जनरल नरवणे यांनीही दिला दुजोरा

  • राहुल गांधी यांच्या दाव्यावर ‘पेंग्विन रँडम हाऊस’ या प्रकाशन संस्थेने केले स्पष्ट

  • पुस्तकाची छापील किंवा डिजिटल स्वरूपातील प्रत कॉपीराईट नियमांचे ठरणार उल्लंघन

माजी सैन्यदलप्रमुख जनरल मनोज नरवणे व खासदार राहुल गांधी

नवी देहली – काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी संसदेत माजी सैन्यदलप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या कथित प्रकाशित पुस्तकाचे उतारे वाचून दाखवले होते. त्याला सत्ताधारी खासदारांकडून पुष्कळ विरोधही झाला. आता पुस्तकाची प्रकाशन संस्था ‘पेंग्विन रँडम हाऊस इंडिया’ने औपचारिक स्पष्टीकरण दिले आहे. ‘जनरल मनोज नरवणे यांच्या आत्मचरित्रातील ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या पुस्तकाचे विशेष प्रकाशन अधिकार केवळ आमच्याकडे आहेत. तसेच हे पुस्तक अद्याप कोणत्याही स्वरूपात प्रकाशित झालेले नाही’, असे या संस्थेने स्पष्ट केले आहे.

या भूमिकेला १० फेब्रुवारीच्या सायंकाळी जनरल नरवणे यांनी स्वत: दुजोरा दिला. त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, प्रकाशन संस्थेने स्पष्ट केलेली भूमिकाच पुस्तकाची सद्य:स्थिती आहे.

प्रकाशन संस्थेने म्हटले की, आम्ही स्पष्ट करू इच्छितो की, ‘छापील किंवा डिजिटल स्वरूपात’ पुस्तकाच्या कोणत्याही प्रती प्रकाशित, वितरित, विकल्या गेल्या नाहीत किंवा इतर कोणत्याही प्रकारे लोकांना उपलब्ध करून दिल्या गेल्या नाहीत. सध्या प्रचलित असलेली कोणतीही आवृत्ती – पूर्ण किंवा अंशतः, कोणत्याही स्वरूपात, कॉपीराईट (विशेषाधिकार) उल्लंघन ठरेल. अशा अनधिकृत वितरणाविरुद्ध कायदेशीर उपाययोजना केल्या जातील, असा इशाराही ‘पेंग्विन रँडम हाऊस इंडिया’ने दिला आहे.

काय आहे प्रकरण ?

राहुल गांधी यांच्या मते ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या पुस्तकामध्ये वर्ष २०२० मध्ये लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्या संघर्षाविषयी सरकारला गैरसोयीचे ठरतील, अशी तथ्ये आहेत. राहुल गांधी यांनी या पुस्तकातील काही उतारे संसदेत वाचून दाखवले होते. त्यात या प्रकरणाच्या वेळी मोदी सरकारने जनरल नरवणे यांना एकाकी सोडले आणि चिनी सैनिकांवर गोळीबार करायची कि नाही, याचा निर्णय घेण्याचा अधिकार पूर्णपणे त्यांच्यावर सोपवला होता.

संपादकीय भूमिका

असे आहे, तर राहुल गांधी यांच्यावर कारवाई होण्यासाठी या प्रकाशन संस्थेनेच पुढाकार घेतला पाहिजे ! जर संस्था असे करणार नसेल, तर पोलिसांनी चीनसमर्थक विधान करणार्‍या राहुल गांधी यांच्यासमवेतच प्रकाशन संस्थेवरही गुन्हा नोंदवला पाहिजे !