भावी पिढीला सनातन संस्कृतीशी जोडून ठेवण्यात संतांचे बहुमोल योगदान ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

हरिद्वार येथे स्वामी सत्यमित्रानंद गिरीजी महाराज समाधी मंदिरात श्रीविग्रह मूर्ती स्थापना समारंभ !

(डावीकडून) स्वामी अवधेशानंद गिरीजी महाराज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज

हरिद्वार – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला मोठी गती मिळाली आहे. त्यामुळे भावी पिढ्याही स्वतःला सनातन संस्कृतीशी जोडून घेऊ लागल्या आहे. त्यांनाही या संस्कृतीचा अभिमान वाटू लागला आहे. स्वामी सत्यमित्रानंदजी यांनी भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. स्वत:च्या आचरणातून त्यांनी संस्कृतीचे पोषण भावी पिढीकडे सुपूर्द केले. भावी पिढीला सनातन संस्कृतीशी जोडण्यात संतांचे योगदान बहुमोल आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतकार्याचा गौरव केला.

४ फेब्रुवारी या दिवशी उत्तराखंड येथील हरिद्वार येथे श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरिजा महाराज यांच्या समाधी मंदिरात श्रीविग्रह मूर्ती स्थापना समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या सोहळ्यास माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, जुना आखाड्याचे पीठाधिश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरीजी महाराज, श्रीराम जन्मभूमी मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी, पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया, उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ल, स्वामी अखिलेश्वरानंदजी, स्वामी हरिचेतनानंदजी, स्वामी ललितानंद गिरीजी, महंत देवानंदसरस्वती आदी मान्यवर उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, ‘‘स्वामी सत्यमित्रानंद गिरी यांनी सनातन संस्कृतीच्या जगभरात विखुरलेल्या प्रवाहांना एकत्रित आणण्याचे महत्त्वाचे कार्य केले. त्यांनी स्वत:चे आयुष्य मानवतेच्या कार्यासाठी वाहिले. आपत्तीच्या ठिकाणी साहाय्य करून त्यातून त्यांनी सनातन संस्कृतीची ओळख निर्माण केली. जगभरातील अनेक संस्कृती नष्ट झाल्या; पण भारतीय सनातन संस्कृती आजही टिकून आहे.’’