BLA Attack : बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या आक्रमणात आतापर्यंत २०० हून अधिक पाकिस्तानी सैनिक आणि पोलीस ठार

क्वेटा (बलुचिस्तान) – बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (‘बी.एल्.ए.’ने) ‘ऑपरेशन हेरॉफ २’ ही मोठी मोहीम राबवली. ही मोहीम ४० घंट्यांपेक्षा अधिक काळ चालली. या काळात अनेक जिल्ह्यांत आक्रमणे करण्यात आली. या मोहिमेत पाकिस्तानी सैन्य, पोलीस आणि फ्रंटियर कॉप्स (सीमा सुरक्षेसाठी तैनात सैनिक) यांचे २०० पेक्षा अधिक सैनिक ठार झाले आहेत, तर १७ जणांना कह्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती बी.एल्.ए.ने दिली आहे. या दाव्याला अद्याप पाककडून दुजोरा देण्यात आलेला नाही.

बी.एल्.ए.चे प्रवक्ते जीयंद बलोच यांच्या मते, करान, मस्तुंग, तुंप आणि पसनी या भागांत ही मोहीम पूर्ण करण्यात आली. तसेच क्वेटा आणि नोश्की यांच्या काही भागांत  माघार घ्यावी लागली.

१३३ आतंकवादी ठार झाल्याचा पाकचा दावा

बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी सांगितले की, ‘या आक्रमणात १७ सुरक्षा कर्मचारी आणि ३१ सामान्य नागरिक यांचा मृत्यू झाला आहे.’ पाकिस्तानी सैन्याच्या म्हणण्यानुसार १३३ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले.

बलुच आक्रमणात महिला आत्मघातींचा समावेश

हवा बलोच व आसिफा मेंगल

बलुच आर्मीच्या या मोहिमेतील सर्वाधिक महत्त्वाचा भाग म्हणजे महिला आत्मघाती आक्रमणकर्त्यांचा सहभाग होय. आसिफा मेंगल हिने नोश्की येथे आय.एस्.आय.च्या (इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्सच्या) मुख्यालयावर स्फोटकांनी भरलेल्या चारचाकीद्वारे आक्रमण केले. आसिफा ही मजीद ब्रिगेडची सदस्य होती आणि वर्ष २०२३ मध्ये संघटनेत सहभागी  झाली होती. याचवेळी ग्वादर आघाडीवर हवा बलोच नावाची आणखी एक महिला आत्मघाती आक्रमणकर्ती ठार झाली. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनीही किमान २ आक्रमणांमध्ये महिलांचा सहभाग असल्याचे सांगितले.

बी.एल्.ए.ने मान्य केले आहे की, या मोहिमेत त्यांचे १८ लोक ठार झाले. त्यामध्ये मजीद ब्रिगेडचे ११ आत्मघाती सदस्य, फतेह स्क्वॉडचे ४ आणि एस्.टी.ओ.एस्. शाखेचे ३ सदस्य होते. तसेच नोश्कीचे उपजिल्हाधिकारी आणि साहाय्यक उपजिल्हाधिकारी यांना कह्यात घेऊन नंतर मानवतेच्या आधारावर मुक्त करण्यात आल्याचा दावाही बी.एल्.ए.ने केला आहे.