#BoycottTurkeyAzerbaijan : वर्ष २०२५ मध्येही अझरबैजान आणि तुर्कीये यांच्याकडे भारतीय पर्यटकांची पाठ फिरवली

‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी पाकची बाजू घेतल्याचा परिणाम

नवी देहली – जून ते डिसेंबर २०२५ या कालावधीत अझरबैजान येथे जाणार्‍या भारतीय पर्यटकांच्या संख्येत ६३ टक्के, तुर्कीयेला जाणार्‍या भारतीय पर्यटकांची संख्या ३४ टक्के इतकी घटली आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वार्षिक पर्यटनाच्या माहितीनुसार वर्ष २०२४ च्या पर्यटनाच्या तुलनेत वर्ष २०२५ च्या शेवटच्या ६ महिन्यांत ही घट झाली आहे.

भारताने पाकपुरस्कृत जिहादी आतंकवाद्यांच्या विरोधात केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या काळात अझरबैजान आणि तुर्कीये यांनी पाकला पाठिंबा दिला होता. यावरून देशप्रेमी भारतियांनी अझरबैजान आणि तुर्कीये या देशांकडे पर्यटनाच्या दृष्टीने पाठ फिरवली आहे.

१. उपलब्ध माहितीनुसार जून ते डिसेंबर २०२४ या काळात १ लाख ५३ सहस्र भारतीय पर्यटकांनी अझरबैजानला भेट दिली होती; मात्र जून ते डिसेंबर २०२५ या कालावधीत ही संख्या सुमारे ५७ सहस्रांवर घसरली.

२. जून ते डिसेंबर २०२४ मध्ये २ लाख ५ सहस्र भारतीय पर्यटकांनी तुर्कीयेचा प्रवास केला होता; परंतु जून ते डिसेंबर २०२५ मध्ये ही संख्या सुमारे १ लाख ३५ सहस्र झाली. जून २०२५ पासून प्रत्येक महिन्याला तुर्कीये आणि अझरबैजान येथे जाणार्‍या भारतीय पर्यटकांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याचे दिसून आले.

३. अझरबैजान पर्यटन विभागाच्या माहितीनुसार भारत अझरबैजानला पर्यटक पाठवणार्‍या अव्वल ३ देशांमध्ये होता. वर्ष २०२४ मध्ये भारतीय पर्यटकांची संख्या २ लाख ४३ सहस्र ५८९ इतकी होती; जी वर्ष २०२३ मधील १ लाख १७ सहस्र ३०२ च्या तुलनेत १०८ टक्क्यांनी अधिक होती; मात्र वर्ष २०२५ मध्ये परिस्थिती पूर्णपणे पालटली आहे.

४. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या काळात तुर्कीये आणि अझरबैजान यांनी पाकिस्तानला उघडपणे साहाय्य केल्याचेही समोर आले. पाकिस्तानने भारताविरोधात तुर्कीयेमध्ये बनवलेल्या ड्रोनचा वापर केला होता, तसेच राजनैतिक पातळीवरही तुर्कीयेने पाकिस्तानला स्पष्ट पाठिंबा दिला होता. यानंतर भारतियांनी या दोन्ही देशांविरोधात बहिष्काराची मागणी केली होती.