रेल्वेगाडी ४ घंटे विलंबाने चालत असल्यास तात्काळ तिकीट रहित करता येणार !

तिकिटाचे सर्व पैसेही परत मिळणार !

भारतीय रेल्वे

नवी देहली – तात्काळ तिकीट आरक्षणासंदर्भात रेल्वे विभागाने एक महत्त्वाचा पालट केला आहे. आता रेल्वे रहित झाली किंवा ती ४ घट्यांपेक्षा विलंबाने धावत असेल, तर प्रवासी त्यांचे तात्काळ तिकीट रहित करू शकतात, तसेच त्यांना त्याचे संपूर्ण पैसे परत मिळू शकतील. आतापर्यंत तात्काळ कोट्यातून एखादे ‘कन्फर्म तिकीट’ मिळाले की, ते रहित केले, तर एकही पैसा परत मिळू शकत नव्हता, परंतु आता वरील दोन कारणांपैकी कोणत्याही एका कारणामुळे तात्काळ तिकिट रहित केल्यानंतर सर्व पैसे परत मिळू शकतील. दलालांची घुसखोरी रोखण्यासाठी रेल्वे विभागाने हे पाऊल उचलले आहे. यामुळे तात्काळ तिकीट सहज मिळण्याची शक्यता वाढली आहे.

तात्काळ तिकिटाच्या आशेवर रहाणार्‍या प्रवाशांचा दलालांच्या घुसखोरीमुळे अपेक्षाभंग व्हायचा. काही सेकंदांतच सर्व तिकिटांचा कोटा संपायचा. याच पार्श्वभूमीवर रेल्वेने नियमांमध्ये हे पालट केले आहेत.

एका दिवसात एका खात्यावर दोन तिकिटेच काढता येणार !

रेल्वेगाडी सुटण्याच्या एक दिवस आधी सकाळी १० वाजता तात्काळ तिकीट आरक्षण चालू होत असते. नव्या नियमांनुसार यापुढे हे आरक्षण केवळ ‘आय.आर्.सी.टी.सी.’च्या अधिकृत संकेतस्थळावरूनच करता येईल. त्या खात्याशी ‘आधारकार्ड’ जोडले जाणे याआधीच अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच एका खात्यावरून एका दिवसात दोन तिकिटेच आरक्षित करता येतील. तिकिटांच्या साठेबाजीतून प्रवाशांची केली जाणारी लूट थांबवायला यामुळे रेल्वे विभागाला सोपे होणार आहे. संशयास्पद खात्यांवर अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणालींच्या माध्यमातून लक्षही ठेवले जाईल.