Bangladesh Hindu Murder : बांगलादेशात आणखी एका हिंदु युवकाला जिवंत जाळले

गॅरेजला आग लावताना आरोपी (डावीकडे) हत्या झालेला हिंदु युवक चंचल चंद्र भौमिक (उजवीकडे)

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात पुन्हा एकदा एका हिंदु युवकाला जिवंत जाळण्यात आले. चंचल चंद्र भौमिक असे त्याचे नाव असून तो कोमिला जिल्ह्यातील लक्ष्मीपूर गावाचा रहिवासी होता. ही घटना शुक्रवार, २३ जानेवारीच्या रात्री घडली. बांगलादेशाचे पत्रकार सलाह उद्दीन शोएब चौधरी यांनी समाजमाध्यमांवरील पोस्टद्वारे  या घटनेची सविस्तर माहिती दिली.

१. चंचल भौमिक गेल्या ६ वर्षांपासून नरसिंहदी येथे रुबल मियाँ यांच्या गॅरेजमध्ये काम करत होता आणि तेथेच वास्तव्यास होता. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार २३ जानेवारीला रात्री काम संपल्यानंतर चंचल गॅरेजमध्येच झोपला. जवळील सीसीटीव्हीमध्ये रात्री उशिरा एक व्यक्ती पेट्रोल ओतून गॅरेजला आग लावतांना दिसली. आग लावल्यानंतर बराच वेळ ती व्यक्ती तेथेच थांबली होती. चंचलचा मृत्यू झाल्याची निश्चिती झाल्यानंतरच ती तेथून निघून गेल्याचे व्हिडिओमधून स्पष्ट होते.

२. चंचल भौमिक याच्या वडिलांच्या निधनानंतर घराचे संपूर्ण दायित्व त्याच्याकडे आले. चंचलची आई आजारी असून त्याचा एक भाऊ दिव्यांग (अपंग) आहे. चंचलच्या कुटुंबियांनीही ही हत्या असल्याचा आरोप केला आहे. नाव उघड न करण्याच्या अटीवर काही स्थानिकांनी धार्मिक कारणांमुळेच चंचलची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे.

हिंदु समाजात भीतीचे वातावरण

या घटनेमुळे बांगलादेशामधील हिंदु संघटना आणि सामान्य हिंदू यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंदु संघटनांनी या घटनेविषयी तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली आहे. यापूर्वी मेमनसिंह येथे दीपू चंद्र दास यांना जिवंत जाळून त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर शरियातपूर येथे खोकन चंद्र दास यांना ठार मारण्यात आले आणि आता नरसिंहदी येथे चंचल चंद्र भौमिक यांना जिवंत जाळण्यात आले.

संपादकीय भूमिका

  • बांगलादेशात हिंदू नामशेष होईपर्यंत त्यांचे हत्यासत्र थांबणार नाही आणि कुणीही ते थांबवण्यासाठी प्रयत्नही करणार नाही, हे हिंदूंना लज्जास्पद !
  • जेथे हिंदूबहुल भारतच बांगलादेशातील हिंदूंच्या हत्यासत्रांची नोंद घेत नाही तेथे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग ती कधीतरी घेईल का ?