उपजिल्हा रुग्णालयातील समस्या सोडवण्यासाठी २ दिवसांची मुदत

सावंतवाडी – येथील उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांविषयी येत्या २ दिवसांत ठोस लेखी आश्वासन जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून न मिळाल्यास २६ जानेवारी या दिवशी नाईलाजाने उपोषणास बसावे लागेल, अशी चेतावणी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समितीने दिली आहे.
उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांविषयी चर्चा करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने कृती समितीच्या शिष्टमंडळाला २२ जानेवारीला सायंकाळी निमंत्रित केले होते. वैद्यकीय अधीक्षक रजेवर असल्याने प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीषकुमार चौगुले यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली.
चर्चेच्या वेळी शिष्टमंडळाने सांगितले की, सावंतवाडीत उपजिल्हा रुग्णालयात कागदोपत्री ३४ डॉक्टर असल्याची नोंद आहे. प्रत्यक्षात कित्येक पदे रिक्त आहेत ? ‘अभिनव फाऊंडेशन’ने प्रविष्ट केलेल्या जनहित याचिकेच्या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपिठाने (सर्किट बेंचने) रुग्णालयाची पहाणी करण्यासाठी समिती स्थापन केली. त्या समितीने पहाणी केली आणि अहवाल देऊन ४ महिने झाले, तरी या अहवालावर कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही. स्वतः आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी पहाणी करून वरच्या मजल्यावरील ज्या खोलीत भंगार सामान भरले आहे, ती खोली रिकामी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. ‘ही खोली रिकामी करून त्या ठिकाणी २० रुग्णांचा एक वॉर्ड (विभाग) होऊ शकेल’, अशा उपसंचालकांच्या सूचना होत्या; मात्र त्याचेही पालन झालेले नाही. एम्.डी. फिजिशियन उपलब्ध करून द्यावेत. दोन भूलतज्ञ कायम स्वरूपी मिळालेत. रक्तपेढीची साठवणूक क्षमता ४०० रक्त बँग करावी, ट्रामा केअर युनिट कार्यरत करावेत, रेडिओलाँजिस्ट उपलब्ध करून द्यावेत आदी मागण्या शिष्टमंडळाने केल्या होत्या. याविषयी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, उपसंचालक डॉ. माने यांची कृती समितीने भेट घेतली होती. त्या वेळी काही तोंडी आश्वासने दिली गेली. आश्वासनांना लिखित उत्तर मिळायला हवे, अशी मागणी कृती समितीने केली. यासंदर्भात लेखी पत्र शनिवार, २४ जानेवारीपर्यंत द्यावे अन्यथा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नाईलाजाने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासमोर २६ जानेवारीला उपोषणास बसावे लागेल, अशी चेतावणी कृती समितीने या चर्चेच्या वेळी दिली.
या चर्चेच्या वेळी एन्.बी. रेडकर, कृती समितीचे रवींद्र ओगले, राजू केळुसकर, अधिवक्ता नंदन वेंगुर्लेकर, मल्टीस्पेशालिटी रुग्णालयासाठी जागा देणारे मालक रवींद्र केरकर, माडखोल माजी सरपंच संजय लाड, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य रवि जाधव, ‘सामाजिक बांधीलकी’ संघटनेच्या रूपा मुद्राळे, भाऊ पाटील, ‘अभिनव फाऊंडेशन’चे खजिनदार जितेंद्र मोरजकर आदी उपस्थित होते.
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
तुर्भे विभागात विद्युत् पुरवठा वारंवार खंडित; जनता त्रस्त !
स्थानांतरासाठी शिक्षकाकडून २५ सहस्र रुपयांची लाच घेतांना अधिकारी डी.सी. कुंभार यांना अटक
अक्कलकोट येथे शाळकरी मुलीवर अत्याचार करणार्या अरबाजला अटक !