‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !

  • मे महिन्यातील प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणामुळे कठोर निर्बंध

  • २१ जूनला होणार परीक्षा

नवी देहली – २१ जूनला ‘नीट-यूजी’या पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रश्नपत्रिका बनवणार्‍या सर्व तज्ञांना अज्ञात ठिकाणी ठेवले असून त्यांचा कुणाशीही संपर्क येणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. परीक्षा प्रणालीवरील विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी आणि प्रश्नपत्रिका फुटीची कोणतीही शक्यता रोखण्यासाठी ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

मे महिन्यात झालेल्या मूळ ‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा) परीक्षेनंतर प्रश्नपत्रिका फुटल्याचे समोर आले होते. त्यामुळे तिला रहित करण्यात आले. यानंतर झालेल्या व्यापक अन्वेषणात अनेक तज्ञ आणि प्रश्नपत्रिका तयार करणारे अशा अनेक जणांना अटक करण्यात आली. या घोटाळ्याची व्याप्ती अनेक राज्यांमध्ये पसरल्याचे अन्वेषणातून समोर आले. यामुळे कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

नेमके कुणाला ठेवण्यात येणार अज्ञातवासात ?

प्रश्नपत्रिका बनवणारे, त्याचे परीक्षण करणारे, भाषांतर करणारे आणि गोपनीय प्रक्रियेत सहभागी असलेल्या व्यक्ती

सततच्या देखरेखीतील नियम काय ?

भ्रमणभाष, भ्रमणसंगणक, स्मार्टवॉच आणि इतर संवाद साधणारी उपकरणे वापरण्यास मनाई असेल. इंटरनेट वापराच्या संदर्भात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत आणि बाह्य जगाशी संपर्क जवळपास तोडण्यात आला आहे. या केंद्रात येण्या-जाण्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात असून केवळ अधिकृत व्यक्तींनाच प्रवेश दिला जात आहे.

परीक्षेची व्याप्ती

‘नीट’ परीक्षेला २२ लाखांहून अधिक विद्यार्थी बसण्याची शक्यता आहे. २१ जूनच्या दुपारी २ ते ५:१५ या वेळेत पारंपरिक लेखी पद्धतीने परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा भारतातील ५५१ आणि परदेशातील १४ शहरांमध्ये आयोजित केली जाणार आहे.

प्रत्येक टप्प्यावर सतर्कता !

अधिकार्‍यांनी सांगितले की, प्रश्नपत्रिका तयार करणे आणि त्याचे भाषांतर करण्यापासून ते ‘मॉडरेशन’ (गुण-पडताळणी), छपाई, पॅकेजिंग, साठवणूक, वाहतूक आणि वितरण अशा परीक्षा प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर आता अधिक कडक देखरेख ठेवली जात आहे. संपूर्ण प्रक्रिया वेगवेगळ्या स्वतंत्र भागांमध्ये विभागण्यात आली आहे, जेणेकरून कोणत्याही एका व्यक्तीला किंवा गटाला कामकाजाच्या संपूर्ण साखळीचा ताबा किंवा माहिती मिळणार नाही.

प्रशासनाकडून प्रश्नपत्रिकांच्या वाहतुकीकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. देशभरात परीक्षेचे साहित्य सुरक्षितपणे पोचवण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या विमानांचा वापर करण्याच्या शक्यतेचाही सरकारने विचार केल्याचे समजते.

सर्व त्रुटींचे पूर्णपणे निराकरण करा ! – केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अधिकार्‍यांना सूचना दिल्या की, मागील परीक्षा प्रक्रियेच्या वेळी समोर आलेल्या त्रुटींचे पूर्णपणे निराकरण करूनच ही फेरपरीक्षा घेतली जावी.

 

संपादकीय भूमिका

अशा प्रकारे निर्बंध घालावे लागणे, हे भारताला लज्जास्पद ! जी शिक्षणप्रणाली चांगला नागरिक सिद्ध करण्यासाठी उभारण्यात आली, तिच्यातच अशा प्रकारच्या प्रवृत्ती घुसणे, हे लज्जास्पद !