भाषा या जोडायला असतात, भांडणासाठी नसतात ! – दिगंबर कामत, मंत्री

२१ व्या जागतिक मराठी संमेलनाचा समारोप

पणजी, ११ जानेवारी (वार्ता.) – पणजी येथे ३ दिवस चालू असलेल्या २१ व्या जागतिक मराठी संमेलनाचा आज समारोप झाला. या दिवशी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, गोव्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, भाजपचे खासदार सदानंद शेट तानावडे आदी उपस्थित होते.

या वेळी मंत्री दिगंबर कामत म्हणाले, ‘‘मला आनंद होत आहे की, वर्ष २००८ मध्ये मी जागतिक मराठी संमेलनाचा स्वागताध्यक्ष होतो आणि कार्यक्रम येथेच झाला होता. २ दशके झाली मराठी अकादमी कार्यरत आहे. प्राथमिक शिक्षण हे मराठीतच झाले आहे. त्यामुळे बोलण्यासाठी आणि लिहिण्यासाठी मराठी हीच सोयीस्कर आहे. मराठी भाषेमुळे आमची संस्कृती टिकून राहिली आहे. भाषा या जोडायला असतात. भांडणासाठी नसतात. सकाळी उठल्याबरोबर मराठी दैनिकच वाचले जातात. कितीतरी राष्ट्रांमध्ये मराठी माणसे पोचली आहेत. तरुण मुले अभंग म्हणतात आणि त्यात एकरूप होतात, ते बघून पुष्कळ उत्साह वाढला आहे. विकसित भारत, आत्मनिर्भर गोवा होण्यासाठी मराठी माणसाचा विकास होणे आवश्यक आहे.’’

मराठी भाषेने गोव्यातील लोकसंस्कृती आजतागायत टिकवली ! – केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक

‘शोध मराठी मनाचा’ ही या संमेलनाची संकल्पना केवळ एक विषय नाही, तर ती मराठी अस्मितेचा, संस्कृतीचा आणि विचारपरंपरेचा गाभा आहे. आजच्या प्रवर्तनीय काळात मराठी भाषा आणि संस्कृती नव्या आव्हानांना सामोरी जात असतांना, हा विषय अधिक समर्पक ठरतो. गोवा ही भूमी केवळ निसर्गसौंदर्याने नटलेली नाही, तर ती सांस्कृतिक समन्वयाची, सहिष्णुतेची आणि भाषिक सौहार्दाची भूमी आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला ‘समदृष्टीचा धर्म’ गोव्याच्या संस्कृतीत आजही प्रत्यक्ष अनुभवायला मिळतो. गोव्यातील लोकसंस्कृतीला समृद्ध करणारी लोकगीते ज्यामधे ओव्या, धालो गीते, फुगडी गीते, सोकारती, कुणबी गीते ही सगळी संस्कृती मराठी भाषेने आजतागायत टिकवली आणि संस्कारित केली. गोव्याच्या मराठी साहित्यपरंपरेतील आद्य संतकवी म्हणून १६व्या शतकातील थोर संत सोयरोबा आंबिये यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. त्यांनी वारकरी संप्रदायातील भक्तीचा प्रसार गोव्यात केला. संगीत नाट्याचे बीज गोव्याच्या भूमीत रोवले गेले आणि महाराष्ट्राच्या सकस भूमीत फोफावले. या संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक मंडळाचे, स्वयंसेवकांचे, कलाकारांचे, वक्त्यांचे आणि उपस्थित सर्व मराठीजनांचे मी मनापासून अभिनंदन करतो.’’