मराठी भाषा जगण्याची आणि आधुनिकतेची जोड असलेली व्हावी !

‘अभिजात दर्जानंतरची मराठी : संधी आणि आव्हाने’ या परिचर्चेतील सूर

सातारा, ६ जानेवारी (वार्ता.) – मराठी भाषेला अभिजात (समृद्ध) भाषेचा दर्जा मिळाला; परंतु इथेच न थांबता मराठी भाषा ही जगण्याची भाषा बनवली पाहिजे. यासाठी सर्वांनी स्वतःपासून प्रारंभ केला पाहिजे. त्याला आधुनिकतेची जोड दिली पाहिजे. शासनाकडूनही योग्य नियोजनाची आवश्यकता आहे, असा सूर उमटला.

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘अभिजात दर्जा नंतरची मराठी : संधी आणि आव्हाने’ या विषयावरील चर्चेत आयोजन करण्यात आले होते. यामध्ये श्याम जोशी, डॉ. संदीप श्रोत्री, डॉ. सुहास उगले, पी. विठ्ठल, श्रीधर लोणी, डॉ. चैती साळुंके आणि डॉ. अस्मिता हवालदार या भाषातज्ञांनी आपली मते मांडली.

श्रीधर लोणी म्हणाले, ‘‘मराठी भाषा काळानुरूप होण्यासाठी ती आधुनिक होणे आवश्यक आहे. आपल्याकडे मराठीची बाजारपेठ नाही, हे दुर्दैवी आहे. आपण मराठी असल्याचा अभिमान बाळगतो; परंतु मराठी अस्मिता आपल्या आयुष्यात आढळत नाही. मराठी चित्रपटांची हीच अवस्था आहे. आशयघन निर्मितीपासून बाजारपेठ निर्मितीपर्यंत सर्व स्तरांवर आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे.’’

या वेळी पी. विठ्ठल म्हणाले, ‘‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होऊन १ वर्ष झाले, तरीही मराठीच्या विकासासाठी शासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. या घटनेचा केवळ उत्सव केला जातो. मराठी भाषेला ‘ज्ञानभाषा’ बनवण्याआधी, तिला ‘लोकभाषा’ बनवणे आवश्यक आहे.’’

या वेळी श्याम जोशी म्हणाले, ‘‘मराठी भाषेला राजमान्यता मिळाली; परंतु समाज अजूनही गंभीर नाही. प्रचलित शब्दांचा एकही कोश आज उपलब्ध नाही. आमचे मराठीवरचे प्रेम बेगडी आहे. आमच्या घरी आमची मुले कोणती भाषा बोलतात याकडे आम्ही लक्ष देत नाही, याविषयी खेद वाटतो.’’

डॉ. संदीप श्रोत्री म्हणाले, ‘‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आपले उत्तरदायित्व अजून वाढले आहे. बोलायची भाषा आणि जगण्याची भाषा यातील अंतर आपल्याला अजूनही मिटवता आलेले नाही. यासाठी गणेशोत्सव मंडळे, नवरात्रोत्सव मंडळे तसेच गल्लीबोळात मराठीविषयी काही उपक्रम राबवले गेले पाहिजेत.’’

संपादकीय भूमिका :

मराठीबहुल महाराष्ट्रात मराठीची बाजारपेठ निर्माण होण्यासाठी मराठीप्रेमी आणि साहित्यिक यांनी प्रयत्न करावेत !