हडफडे येथील नाईट क्लबमधील आग दुर्घटना

पणजी, १ जानेवारी (वार्ता.) – हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ या नाईट क्लबला ६ डिसेंबर २०२५ च्या रात्री आग लागून २५ जणांचामृत्यू झाला होता. या प्रकरणी हडफडे पंचायतीचे सचिव रघुवीर बागकर यांनी न्यायदंडाधिकार्यांच्या अन्वेषण समितीच्या समोर ‘संबंधित नाईट क्लबच्या अनुज्ञप्तीचे नूतनीकरण न झाल्याची माहिती असूनही मी इतर खात्यांना कळवले नाही किंवा क्लबला टाळे ठोकले नाही’, अशी साक्ष दिली होती. त्याचप्रमाणे या प्रकरणी हडफडे पंचायतीचे सरपंच रोशन रेडकर यांनीही ‘मी याविषयी इतर खात्यांना कळवले नाही’, अशी साक्ष समितीकडे दिली होती. न्यायदंडाधिकार्यांच्या अन्वेषण समितीच्या अहवालात सरपंच रोशन रेडकर आणि सचिव रघुवीर बागकर यांच्या भूमिकेमुळे संबंधित नाईट क्लब अनधिकृतपणे चालू राहिला, असा ठपका ठेवण्यात आला आहे. यानंतर ३१ डिसेंबर या दिवशी सायंकाळी उशिरा पंचायत संचालक महादेव आरोंदेकर यांनी पंचायतीचे सचिव रघुवीर बागकर यांना सेवेतून बडतर्फ करणारा आणि सरपंच रोशन रेडकर यांना अपात्र ठरवणारा आदेश काढला.
या आदेशात म्हटले आहे की, संबंधित नाईट क्लबचे बांधकाम पाडण्यासाठी अनेक वेळा संधी असूनही हडफडे पंचायतीचे सरपंच आणि सचिव यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. न्यायदंडाधिकार्यांच्या अन्वेषणाच्या पूर्वी पंचायतीचे सरपंच आणि सचिव यांनी त्यांचे दायित्व झटकले होते. या वेळी सचिव रघुवीर बागकर पसार झाला होता. या प्रकरणी सचिव रघुवीर बागकर यांनी नागरी सेवा आणि पंचायत कायद्यातील नियम यांचे सर्रासपणे उल्लंघन करून अत्यंत गंभीर निष्काळजीपणा ठेवला, कर्तव्यात गंभीर त्रुटी ठेवल्या, प्राणाणिकपणाविषयी संशयाला वाव ठेवला आणि अव्यावसायिक वर्तन केले आहे. पंचायतीचे सरपंच रोशन रेडकर यांनीही पंचायतीचे अहित साधणारे काम केले आणि सार्वजनिक विश्वासाला तडा दिला आहे.’’ हडफडे पंचायतीचे सरपंच रोशन रेडकर यांचे पंचायत सदस्यत्व तात्काळ प्रभावाने रहित करण्यात आले आहे, तसेच त्यांना पुढील ५ वर्षे कोणत्याही पंचायतीची निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे. न्यायदंडाधिकार्यांच्या अन्वेषण समितीच्या अहवालात पुढील महत्त्वाच्या गोष्टी नोंदवण्यात आल्या आहेत.
पंचायतीच्या संरक्षणाने संबंधित नाईट क्लब अनधिकृतपणे चालू राहिला
नियमांचे उल्लंघन करून आस्थापनधारकांना संरक्षण दिल्याने पंचायत पदाधिकार्यांचे संगनमत स्पष्ट झाले आहे. प्रारंभीपासूनच जवळपास सर्व ना-हरकत प्रमाणपत्रांवर पंचायतीचे सरपंच रोशन रेडकर यांच्या स्वाक्षर्या आहेत आणि यामुळे अधिकाराचा गैरवापर झाला आहे. त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार तातडीच्या तपासण्या, रात्रीची गस्त घालणे आणि अचानक तपासण्या करणे, असे प्रकार पंचायतीने केलेले नाहीत. उपलब्ध नोंदींनुसार भूमीचे मूळ मालक सुनील दिवकर आणि प्रदीप घाडी आमोणकर यांनी ‘मैझॉन्स हॉटेल’च्या नावाने प्रारंभी या ठिकाणी अनधिकृत बांधकाम केले आणि हेच या प्रकरणी मुख्य दोषी आहेत.
पोलिसांनी ध्वनीप्रदूषणासंबंधीच्या अनेक तक्रारींवर कोणतीही कारवाई केली नाही
अहवालात नमूद केल्यानुसार १ जानेवारी २०२४ ते १८ डिसेंबर २०२५ या कालावधीत स्थानिक नाईट क्लबमधील ध्वनीप्रदूषण आणि पार्किंग यासंबंधी अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या; मात्र पोलिसांना ‘घटनास्थळी काहीच आक्षेपार्ह आढळले नाही’, असा शेरा लिहून या तक्रारींचे अन्वेषण बंद केले. पोलिसांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नाईट क्लबचे तत्परतेने सर्वेक्षण करणे आणि नियमितपणे रात्रीची गस्त घालणे किंवा आकस्मिक पडताळणी केली नाही.
कागदपत्रांविषयीच्या काही गंभीर नोंदी
व्यापार अनुज्ञप्तीसाठी सादर केलेल्या अर्जात गंभीर अनियमितता आढळून आली आहे. अर्जावर निरनिराळ्या शाईत नंतर शब्द घातले गेले आहेत. अनुज्ञप्तीसाठी आवश्यक कागदपत्रे, आराखडे, छायाचित्रे आणि भूमीचे उतारे जोडलेले नव्हते. घर क्रमांकाच्या संदर्भातही गंभीर गोंधळ आहे. अस्तित्वात नसलेले घर क्रमांक दाखवून अनुज्ञप्त्या मिळवण्यात आल्या आहेत. पंचायत कार्यालयात अर्ज आल्यानंतर अवघ्या काही दिवसांत कोणतीही पडताळणी न करता अनुज्ञप्ती देण्यात आल्या. (यावरून ‘सरपंच आणि सचिव यांना पुष्कळ आर्थिक लाभ झाला असणार’, अशी शंका घेण्यास वाव रहातो. या प्रकरणात वरिष्ठांचे आणि लोकप्रतिनिधींचे संगनमत नसणार कशावरून ? यावर नियंत्रण कसे ठेवणार ? – संपादक)
अनुज्ञप्ती नसतांनाही व्यवसाय चालू
हडफडे-नागोवा पंचायतीने १६ डिसेंबर २०२३ या दिवशी ‘वीईंग जीएस् हॉस्पिटॅलिटी गोवा हडफडे एल्एल्पी’ या संस्थेला मद्यालय, ‘रेस्टॉरंट’ आणि नाईट क्लब व्यवसाय चालवणे यांसाठी अनुज्ञप्ती दिली होती. ही अनुज्ञप्ती ३१ मार्च २०२४ पर्यंतच वैध होती. त्यानंतर आजतागायत या अनुज्ञप्तीचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही; मात्र नाईट क्लब चालूच राहिला.
संपादकीय भूमिकासचिव आणि सरपंच यांच्या अन् त्यांच्या कुटुंबियांच्या या काळातील आर्थिक नोंदी पडताळल्यास आणखी सत्य बाहेर येईल ! |
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक