Iran Protests : इराणमध्ये आर्थिक संकटामुळे जनतेमध्ये उद्रेक !

सरकारी इमारतींच्या तोडफोडीचा प्रयत्न, अनेक ठिकाणी हिंसाचार

तेहरान (इराण) – इराणमध्ये आर्थिक संकट तीव्र झाल्यानंतर लोकांचा संताप उफाळून आला असून देशातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर आंदोलन चालू झाले आहे. आंदोलानाचा चौथा दिवस चालू आहे आणि त्याचा आवाका सातत्याने वाढत आहे. अनेक रस्ते आंदोलनकर्त्यांनी अडवले आहेत. राजधानी तेहरानमध्येही सहस्रो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. अनेक ठिकाणी हिंसाचार झाला असून पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी अश्रुधूराचा वापर केला. माध्यमांच्या माहितीनुसार काही सरकारी इमारतींमध्ये तोडफोडीचा प्रयत्नही झाला.

तेहरानमधून प्रारंभ झालेले आंदोलन देशभर पसरले

महागाई वाढ आणि राष्ट्रीय चलनाचे अवमूल्यन यांमुळे सहस्रो लोक आंदोलन करत आहेत अन् हे आंदोलन आता अनेक शहरांत पसरले आहे. याचा प्रारंभ तेहरानमधील ग्रँड बाजारातील व्यापार्‍यांकडून झाला आणि पुढे ते देशव्यापी आंदोलनात परिवर्तित झाले. आता हे आंदोलन विद्यापिठांपर्यंत पोचले असून विद्यार्थी सरकारविरोधी घोषणा देत आहेत. काही आंदोलनकर्त्यांनी निर्वासित राजा रझा पहलवी यांच्या समर्थनातही घोषणाबाजी केली.

इराणी चलन ऐतिहासिक नीचांकावर

इराणचे चलन रियाल अमेरिकी डॉलरसामोर विक्रमी नीचांकी पातळीवर गेले आहे. एक डॉलर घेण्यासाठी सुमारे १४ लाख रियाल खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे आयात अत्यंत महाग झाली असून महागाई नियंत्रणाबाहेर गेली आहे. आधीच अमेरिकी आणि पाश्चिमात्य निर्बंध यांमुळे देश आर्थिक संकटात आहे अन् प्रादेशिक तणावामुळे अडचणी आणखी वाढल्या आहेत. दैनंदिन खर्च प्रचंड वाढल्याने लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
माध्यमांच्या वृत्तांनुसार नागरिकांवरील कर वाढवण्याची सरकारची सिद्धता आहे. आधीच महागाई आणि आर्थिक दबाव यांचा सामना करणार्‍या जनतेत करवाढीच्या बातम्यांमुळे संताप आणखी भडकला आहे.