राष्ट्र आणि धर्म सर्वतोपरी  !

‘पुष्कळ पूर्वीच्या भूतकाळात न जाता इ.स. १५०० मध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून ते  स्वातंत्र्यलढ्यापर्यंतच्या काळात राष्ट्र अन् धर्म उत्थानासाठी ज्यांनी योगदान दिले, त्यांचे विचार, कार्य जाणून घेऊया. हे समजून घेतांना प्राचीन ऋषी अन् त्यांच्या वैदिक हिंदु धर्म तत्त्वज्ञानांचा संदर्भापुरता उल्लेख करणे इष्ट राहील. 

(भाग – १)

थोर धर्मवेत्ते आणि राष्ट्रोद्धारक स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद

अ. बालपण आणि तारुण्य

इ.स. १८६३ मध्ये कोलकाता नगरीत श्री भुवनेश्वरी माता आणि पिता विश्वनाथ दत्त यांच्या उदरी जन्माला आलेला हा ज्ञानसूर्य राष्ट्र अन् हिंदु धर्म यांच्या उत्थानासाठी जे महान कार्य करून गेला, त्याची बरोबरी क्वचित्च एखाद्या धर्माेपदेशकाशी किंवा राष्ट्रपुरुषाशी  होईल.

लहानपणीच नरेंद्रची अतिशय प्रगल्भ बुद्धी पाहून घरी त्यांच्या आईकडूनच त्याचे प्राथमिक लिहिणे-वाचणे आणि इंग्रजी भाषेचे शिक्षण झाले. त्यानंतर नरेंद्रला रामायण-महाभारतातील शौर्यकथा ऐकण्याची आणि ईश्वराविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली अन् तो तासन्तास ध्यान-मग्न होऊन बसू लागला. तरुणपणी उच्चशिक्षण प्राप्त केल्यावर भारतातील तत्कालीन दैन्य, गरिबी, लाचारी, हीन-दीन आणि गुलामगिरीत खितपत पडलेली प्रजा यांवर विचार करून देशासाठी अन् भारतीय समाजासाठी कार्य करण्याच्या स्वयंप्रेरणेने नरेंद्र भारावून गेला.

महाविद्यालयात शिकत असतांना त्यांना प्राध्यापक विल्यमहेस्टी या नामवंत प्राध्यापकांच्या व्याख्यानातून दक्षिणेश्वरच्या (कोलकाता) श्रीरामकृष्ण परमहंस या आध्यात्मिक गुरूंचा शोध लागला आणि ईश्वराविषयी जाणून घेण्याच्या जिज्ञासूपणाने त्यांनी रामकृष्ण परमहंस यांची भेट घेतली. त्यांनी केलेल्या उपदेशानंतर नरेंद्राने पुढील आयुष्य राष्ट्रोद्धार, हिंदु धर्म आणि येथील महान प्राचीन संस्कृती यांच्या कार्यासाठीच संन्यस्तपणे जीवनभर कार्य करत रहाण्याचा दृढ निश्चय केला.

नरेंद्राचे वय विवाहयोग्य झाल्यावर आई-वडिलांनी त्याच्यापुढे विवाहाचा प्रस्ताव ठेवला असता त्याने स्पष्टपणे नकार देत आजन्म संन्यस्त राहून देशकार्य करण्याचा मानस सांगितला. आई-वडिलांनीही लहानपणापासून त्याच्यातील आध्यात्मिक आणि परोपकारी वृत्ती पाहिली होती. त्यांनी नरेंद्रच्या इच्छित कार्याला पूर्णतः संमती दिली आणि त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे कार्य करण्याची, जीवन जगण्याची अनुमती दिली.

आ. गुरुभेट आणि राष्ट्रोत्थानाच्या कार्यास आरंभ

अधिवक्ता प्रकाश उपाख्य अंबादास देशपांडे

त्याउपरान्त नरेंद्र त्याचा मित्र सुरेंद्रनाथसह दक्षिणेश्वरी रामकृष्ण परमहंस यांना जाऊन भेटले. रामकृष्ण परमहंस यांच्या भेटीने नरेंद्रच्या जीवनात नवे मोठे संक्रमण झाले. त्याने रामकृष्ण परमहंस यांना गुरु मानून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक मार्गावर चालत धर्म, संस्कृती आणि राष्ट्र कार्याला वाहून घेतले.

एकदा गुरुकडे त्यांनी ध्यानधारणेद्वारे समाधी अवस्था सिद्धी कशा तर्‍हेने प्राप्त होऊ शकेल ? याची विचारणा केल्यावर गुरूंनी त्यांना उपदेश केला, ‘तू एका ठिकाणी बसून ध्यानधारणा करून समाधी अवस्थेत बसून रहाण्यासाठी जन्माला आलेला नाहीव. तुला संन्यस्तपणे आणि परिव्रजिक व्रताने भारतभर-जगभर भ्रमण करत हिंदु धर्म, हिंदुत्व, भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व यांचा प्रचार-प्रसार करायचा आहे. राष्ट्रोत्थान आणि भारतातील अनेक सामाजिक समस्यांचे निवारण करण्यासाठीच ईश्वराने तुझी योजना केली आहे.’ गुर्वाज्ञा शिरसावंद्य मानून नरेंद्राचे रूपांतर स्वामी विवेकानंदांमध्ये झाल्यावर हे श्रेष्ठ योगी पायीच यात्रा करत भारतभर फिरू लागले. भगवी वस्त्रे परिधान करून स्वतःची तहानभूक, फिरण्यासाठी पैसा -अडका याची यत्किंचित चिंता न करता त्यांनी आपले कार्य गावोगावी फिरत लोकांसमोर प्रवचने केली. त्यांनी हलाखी आणि गुलामगिरी यांची परिस्थिती, जाती-पाती भेदाभेद, अस्पृश्यता आणि कालबाह्य रूढी यांच्या जाचातून बाहेर पडण्यासाठी समाजसुधारणेच्या ध्येयाने प्रेरित होण्यास लोकांना प्रवृत्त करत प्रवचने दिली.

इ. परिव्राजक स्वामीजी, प्रवास आणि त्यांचे तत्त्वज्ञान

‘परिव्राजक’ हे एक विशेषण आहे. ज्याचा अर्थ फिरणारा, भटकणारा किंवा संन्यासी असा होतो. स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या जीवनांत राष्ट्रहितार्थ हिंदु धर्माचे श्रेष्ठत्त्व  लोकांपर्यंत पोचवले आणि त्यासाठी ते अविरतपणे अनेक ठिकाणी फिरत राहिले.

इ १. गुरु-शिष्य परंपरा : रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य म्हणून त्यांनी वेदांत आणि भारतीय तत्त्वज्ञान पाश्चात्त्य जगात पोचवले.

इ २. शिकागो येथील हिंदु धर्मावरील विख्यात प्रवचन : शिकागोमधील जागतिक धर्म परिषदेत इ.स. १८९३ मध्ये स्वतःच्या प्रभावी वक्तृत्वाने हिंदु धर्माची ओळख तेथील प्रचंड संख्येने जमलेल्या श्रोत्यांना करून दिली आणि त्यांना धार्मिक सहिष्णुतेचा संदेश दिला. ‘अमेरिकेतील माझ्या बंधू-भगिनींनो’ (My Brothers and Sisters in America) असा भाषणाचा आरंभ   करताच खचाखच भरलेल्या सभेतून श्रोत्यांच्या टाळांचा गडगडाटात त्यांना प्रतिसाद मिळाला आणि त्या प्रतिसादातूनच भारतीय संस्कृतीच्या विश्वबंधुत्वाची छाप श्रोत्यांच्या मनावर पडली.

ई. समस्त भारतियांसाठी स्वामीजींचा मौलिक संदेश

‘उठा, भारतियांनो जागे व्हा आणि आपले उच्चतम ध्येय प्राप्त होईपर्यंत स्वस्थ बसू नका. उठा तरुणांनो, राष्ट्र आपले, घ्या आपल्या हाती !’ हे त्यांचे नित्य घोषवाक्य असायचे.

असा हा स्वामी विवेकानंदांच्या रूपात असलेला ज्ञानाचा महामेरू, ज्ञानसूर्य भारतासह सर्व जगाला ललामभूत (गौरवशाली) असलेला, राष्ट्र आणि धर्म उत्थानाचे जीवनकार्य संपवून इ.स. १९०२ मध्ये ४ जुलै या दिवशी योग मार्गाचा अवलंब करून कायमचा अस्तास गेला. त्यांच्या अचेतन देहावर जिथे अग्निसंस्कार करण्यात आले, त्या ठिकाणी आज त्यांचे समाधीमंदिर त्यांच्या उज्ज्वल व्यक्तीमत्त्वाची आणि राष्ट्र-धर्माभिमुख व्यक्तीत्त्वाची, महान भारतराष्ट्र आणि जगत्कल्याण कार्याची ओळख देण्यासाठी डौलाने उभे असून आम्हा सर्वांना प्रेरणा देत आहे.

‘सामर्थ्य हेच जीवन आणि दुर्बलता हेच मरण’, हे अमर सत्य आहे. ‘उठा, समर्थ बना, शक्तीसंपन्न बना, जाणून असा की, तुम्हीच स्वतःचे भाग्यविधाते आणि स्वतःच्या आयुष्याचे निर्माते आहात. तुम्हास हवे असलेले सर्व सामर्थ्य आणि बल तुमच्यामध्येच आहे, ही खूणगाठ मनी पक्की बांधा आणि म्हणून तुम्हीच स्वतःचे भविष्य घडवा’, हा त्यांचा उपदेश भारतियांनी कृतीत आणायला हवा. स्वामी विवेकानंदांविषयी आवर्जून हे नमूद करण्यासारखे आहे की, ‘झाले बहु । होतील बहु । परंतु यासम हा !’

– अधिवक्ता प्रकाश उपाख्य अंबादास देशपांडे, रावेत, पुणे. (१५.१२.२०२५)