पिंपरी-चिंचवडमधील मालमत्तांच्या सर्वेक्षणांतील गंभीर चुकांचे लेखा परीक्षण करणार का ?

  • विधान परिषद लक्षवेधी

  • भाजपचे सदस्य अमित गोरखे यांचा सरकारला प्रश्न

अमित गोरखे

नागपूर, १३ डिसेंबर (वार्ता.) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या करआकारणी आणि करसंकलन विभागाकडून ‘स्थापत्य कन्सल्टंट इंडिया प्रा. लि.’ या खासगी ठेकेदारांकडून शहरातील सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले. संबंधित ठेकेदाराने सहस्रो मिळकतींना चुकीचे क्रमांक देणे, अनधिकृत मालमत्तांची एकत्रित नोंदणी न करता फोड करणे, अधिकची आकारणी, चुकीचे देयके वाटप, असे अनेक गंभीर प्रकार घडले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची त्रयस्थ लेखा निरीक्षकाकडून लेखा परीक्षण करणार का ? अशी लक्षवेधी भाजपचे सदस्य अमित गोरखे यांनी विधान परिषदेत उपस्थित केली.

मंत्री उदय सामंत म्हणाले,

उदय सामंत

‘‘मे. स्थापत्य कन्सल्टंटसी प्रा. लि.’ या खासगी आस्थापनाला मालमत्ता पडताळून करआकारणी करण्यासाठी ५ लाख ८० सहस्र घरांचे लक्ष्य देण्यात आले होते; परंतु प्रत्यक्षात पडताळणी करतांना ३ लाख १ सहस्र मालमत्तांची नोंद नसल्याचे उघड झाले. त्यामुळे त्यांना ४७ कोटी ९५ लाख रुपयांना मान्यता देण्यात आली होती; परंतु वाढीव मालमत्तांची नोंदणी झाल्यामुळे अधिक २९ कोटी रुपये वाढवून दिले. त्यातील केवळ १२ कोटी रुपये दिले आहेत. सध्याच्या अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून त्याची पूर्ण चौकशी करून देयक देण्यात येईल.’’