ज्ञानदानाचे स्वरूप आधुनिक तंत्रज्ञानाने पालटलेले असले, तरी गुरु आवश्यकच ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि

सांगली – ‘कृतज्ञता’ हा मानवी जीवनाचा सर्वात मोठा अलंकार आहे. भारताचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गुरुपरंपरा होय. ज्ञानासाठी गुरूंची आवश्यकता आहे. ज्ञानदानाचे स्वरूप आधुनिक तंत्रज्ञानाने पालटलेले असले, तरी गुरु आवश्यकच आहेत. हातात भ्रमणभाष आल्याने सर्वांची अवस्था ‘गूगलम् शरणम् रज’ अशी झाली आहे. आज ‘एआय’ नावाची चेटकीण डोक्यावर बसली आहे. यामुळे यापुढे ‘टिचर’ राहू नका, तर गुरु म्हणून रहा, असे मार्गदर्शन अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष आणि श्रीकृष्ण जन्मभूमी न्यासाचे उपाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांनी केले. सांगली शिक्षण संस्थेच्या ११२ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने संस्थेमधील गुणवंत शिक्षक, सेवकांच्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

या वेळी सांगली शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष श्री. श्रीराम कुलकर्णी, कार्यवाह श्री. शिरीष गोसावी, उपाध्यक्ष श्री. विजय भिडे, पटवर्धन हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. केदार रसाळ, माजी अध्यक्ष संचालक श्री. नितीन खाडीलकर आदी उपस्थित होते.

संस्कार आणि संस्कारक्षम माणूस देण्यासाठी गुरुच हवेत !

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि पुढे म्हणाले, ‘‘सांगली शिक्षणसंस्थेसारखी संस्था १११ वर्षे पूर्ण करते. इतकी वर्षे एखाद्या ध्येयावर आरुढ होऊन राष्ट्रीय शिक्षणाचा वसा जपण्याचे कार्य करते. हा ऋणानुबंध टिकवता आला पाहिजे. जीवनात ज्याला महान व्हायचे असेल त्यांनी सद्गुरूंची पूजा करावी. यामुळे हा सत्कार नव्हे, तर गुरूंचे पूजन आहे. माणूस आधुनिक वैद्य झाला, अधिवक्ता, अभियंता झाला, तरी त्याला वडील, पत्नी, मुलगा यांच्याशी कसे वागायचे ? याचे शिक्षण म्हणत नाही. आताच्या काळात पैसे मिळतील; मात्र हे आवश्यक शिक्षण कुठून मिळणार ?  गूगल शिक्षण देईल, ‘एआय’ नावाची चेटकीण पैसेही देईल; मात्र संस्कार आणि संस्कारक्षम माणूस कसा आणि कोठून देणार ? यासाठी गुरुच हवेत.

मेकॉलेची शिक्षणातून झालेली गुलामगिरी संपवली पाहिजे !

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि म्हणाले की, अंतरंगात विवेकाची जागृती करण्यासाठी महाभारत वाचावे, पुस्तक पाठ करणे म्हणजे ज्ञान नाही, तर त्याची भूक निर्माण करणे म्हणजे ज्ञान आहे. मेकॉलेची शिक्षणातून झालेली गुलामगिरी संपवली पाहिजे. ‘गुरुत्वाकर्षाणाचा शोध न्यूटनने लावला’, असे आपल्यावर बिंबवले गेले. मँचेस्टरने त्याच्या अहवालात पुराव्यासह ही माहिती खोटी असल्याचे स्पष्ट केले आहे. न्यूटनने त्याच्या नावावर तब्बल ३ शोध खपवले. चुकीची माहिती इंग्रजी शिक्षणाच्या प्रवाहाने आपल्या डोक्यात भरवली. हे धुऊन काढण्यासाठी नव्याने राष्ट्रीय शिक्षणाची आवश्यकता आहे. आपल्या देशाची राष्ट्रभाषा ही संस्कृत आहे.

परिचय कार्यवाह श्री. शिरीष गोसावी यांनी करून दिला, तर श्री. श्रीराम कुलकर्णी यांनी स्वागत केले. या वेळी पुरस्कारप्राप्त शिक्षिका मिताली कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. आभार मुख्याध्यापक केदार रसाळ यांनी मानले.