पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व खड्डे ३ दिवसांमध्ये बुजवणार ! – महापालिकेतील स्थापत्य विभागाचा दावा

पिंपरी (पुणे) – पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी शहर अभियत्यांनी क्षेत्रीय कार्यालयातील स्थापत्य विभागाला १ डिसेंबरची समयमर्यादा दिली आहे. शहरातील रस्त्यांवर ४८३ खड्डे असून ३ दिवसांमध्ये सर्व खड्डे बुजवले जातील, असा दावा स्थापत्य विभागाने केला आहे.

शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर १५ मेपासून ५ सहस्र ६६७ खड्डे आढळले. त्यातील महापालिकेने डांबर आणि कोल्ड मिक्सने २ सहस्र ५७८, बी.बी.एम्.ने ३६१, खडीने १ सहस्र ३५९, पेव्हिंग ब्लॉकने २६४, सिमेंट काँक्रिटने ६२२, असे ५ सहस्र १८४ खड्डे पूर्णत: बुजवले आहेत. शहरामध्ये केवळ ४८३ खड्डे बुजवण्याचे शेष असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. हे सर्व खड्डे बुजवल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश सर्व क्षेत्रीय कार्यालयातील शहरी दळणवळण विभागाच्या स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिले आहेत.

संपादकीय भूमिका :

खड्डे बुजवण्यासमवेत ते ज्या कारणामुळे पडले, ते नष्ट करणे आवश्यक !