Ethiopia Volcano : इथिओपियातील ज्वालामुखी उद्रेकामुळे ४ सहस्र किमी अंतरावरील भारतातही राखेचे ढग !

ॲदिस अबाबा (इथियोपिया) – आफ्रिकी देश इथिओपियामध्ये हायली गुब्बी परिसरात नुकताच ज्वालामुखीचा उद्रेक झाला. तब्बल १० सहस्र वर्षांनी हा उद्रेक झाल्याचे सांगितले जात असतांनाच त्याचा परिणाम सहस्राो किलोमीटर अंतरापर्यंतच्या वातावरणावरही झाला आहे. ज्वालामुखी उद्रेकातून वर आलेल्या राखेचे, ‘सल्फर डाय-ऑक्साईड’चे आणि मोठ्या प्रमाणावर काचेच्या तुकड्यांचे ढग सिद्ध झाले. शेजारील ओमान आणि येमेन या देशांत हे ढग आल्यानंतर ते पुढे गुजरातमार्गे भारतात आले आहेत. काही घंट्यांतच ते चीनच्या दिशेने जातील. यामुळे विमान वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

इथिओपियाच्या पूर्वेकडच्या भागात २३ नोव्हेंबरला ज्वालामुखीचा उद्रेक झाला. तो एवढा प्रचंड होता की, आकाशात तब्बल १४ ते १५ किलोमीटरपर्यंत उद्रेकातील राख आणि खडीच्या तुकड्यांचे लोळ उडाले. हा ज्वालामुखी अजूनही बाहेर येत असला, तरी त्याचे प्रमाण आता उणावले आहे; परंतु त्याचा परिणाम सर्वदूर झाला.