Bandra Fort Liquor Party : राज्य संरक्षित स्मारक असलेल्या मुंबईतील वांद्रे गडावर मद्याची मेजवानी !

मुंबई – राज्य संरक्षित स्मारक असलेल्या वांद्रे गडावर मद्याची मेजवानी (पार्टी) चालू असल्याचा एक व्हिडिओ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अखिल चित्रे यांनी स्वत:च्या ‘एक्स’ खात्यावरून प्रसारित केला आहे. काही स्थानिक नागरिक पोलिसाला घेऊन मेजवानीच्या ठिकाणी आले. पोलिसाने मेजवानीच्या आयोजकांना ‘तुम्हाला अनुमती कुणी दिली ?’, अशी विचारणा केली. त्यावर आयोजकांनी अनुमती असल्याचे सांगितले; मात्र प्रत्यक्षात कागदपत्रे दाखवली नाहीत. हे सर्व चित्रीकरण अखिल चित्रे यांनी प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये वांद्रे किल्ल्यावर मेजवानी चालू असून त्यामध्ये मद्याच्या बाटल्या दिसत आहेत. पोलिसाने अनुमतीच्या कागदपत्रांची मागणी केल्यावरही आयोजक कागदपत्रे दाखवत न दाखवता उलट स्थानिक नागरिकांशी हुज्जत घातली. ‘राज्य संरक्षित स्मारकामध्ये मेजवानी करण्यासाठी अनुमती प्रशासनाने कशी दिली ?’ असा प्रश्न उपस्थित करत विरोधी पक्षाकडून महायुतीच्या नेत्यांवर टीका करण्यात येत आहे.

मेजवानीला अनुमती दिली असेल, तर कारवाई करू ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

याविषयीचा व्हिडिओ मी अद्याप पाहिलेला नाही; मात्र काही लोकांकडून मला हे समजले आहे. वांद्रे गडावर मेजवानीला अनुमती दिली गेली असेल, तर कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना व्यक्त केली.

संपादकीय भूमिका 

अशांवर जोपर्यंत कठोर कारवाई  झाल्यासच असे कृत्य इतर कुणीही करण्यास धजावणार नाही !