आज असलेल्या त्रिपुरारि पौर्णिमेनिमित्त विशेष लेख…
दिवाळीनंतर बहुविध हिंदु सणांचा कालखंड चालू होतो. प्रत्येक ठिकाणी ते साजरे करण्याचा दिमाख वेगळा, उत्साह वेगळा ! अगदी देवदिवाळीसुद्धा याच काळात येते. कार्तिकी एकादशीनंतर तुळशीचे लग्न लावणे, विविध पालख्यांमधून देवाची मिरवणूक काढणे, तेलाच्या दिव्यांनी दीपमाळा उजळणे, दिव्यांनी सजावट करणे, नद्या-सरोवरे यांत दिवे सोडणे इत्यादी गोष्टी बहुतेक सर्व गावांमधून दणक्यात साजर्या केल्या जातात. या मासात सूर्य थोडा उशिरा उगवतो आणि लवकर मावळतो. त्यामुळे काळोख अधिक काळ असतो. थंडी स्थिरावलेली असते. थंडीत पांघरूण घेऊन झोपण्यापेक्षा पहाटे कार्तिक स्नान, काकड आरती, नक्षत्र दीप उजळणे असे उपक्रम केले जातात. त्रिपुरारि पौर्णिमेला गावागावांतून मंदिरांमध्ये उजळल्या जाणार्या दीपमाळा तर डोळ्यांचे पारणे फेडतात.

१. कोकणापासून थेट गोवा, केरळपर्यंत बहुतेक सर्व मोठ्या देवळांमध्ये आढळणार्या दीपमाळा !
महाराष्ट्रात सर्वत्र दीपमाळांचे अनेक प्रकार आढळतात. पायापाशी मोठा आणि वर न्यून होत गेलेला आकार असलेल्या स्तंभावरील अत्यंत कोरीव अशा विविध शाखांवर (स्टँडवर) दिवे ठेवले जाण्याचा प्रकार अधिक लोकप्रिय आहे. दुसर्या प्रकारात संपूर्ण दीपमाळेच्या मधल्या मोठ्या खांबाला दिवे ठेवण्यासाठी अनेक कोनाडे केलेले असतात. या कोनाड्यात दिवे ठेवल्यामुळे ते वार्याने विझण्याची शक्यता पुष्कळ न्यून होते. या स्तंभाला ‘देवळी’ असे म्हटले जाते. असा देवळीचा खांब आणि त्यालाच दिवे ठेवण्यासाठी शाखा (स्टँड) अशा दोन्हीही एकत्रित व्यवस्था असलेल्या दीपमाळा सर्वत्र आढळतात, तर काही ठिकाणी दिवे ठेवण्यासाठी केवळ कोनाडे केलेले असतात. या कोनाड्यांनासुद्धा ‘देवळी’ म्हटले जाते. कोकणापासून थेट गोवा, केरळपर्यंत बहुतेक सर्व मोठ्या देवळांमध्ये अत्यंत सुंदर दीपमाळा पहायला मिळतात. महाराष्ट्रात कोकणामध्ये जांभ्या दगडाच्या, गोव्यामध्ये काळ्या पाषाणाच्या एकाहून एक सुंदर मनोर्यांप्रमाणे बांधलेल्या आणि रंगवलेल्या किंवा धातूच्या प्रचंड दीपमाळा पहायला मिळतात. यात सर्वांत वर कमळाच्या आकाराचा, आकाशाकडे मुख असलेला एक मोठा दिवा पहायला मिळतो. मराठा सरदारांनी जिंकलेल्या अन्य राज्यांमधील काही देवळांमध्येही दीपमाळा बांधलेल्या दिसतात. केरळमध्ये तर काही चर्चच्या समोर हिंदूंच्या दीपमाळांशी साधर्म्य असणारे मोठे मनोरे बांधलेले दिसतात.
कोकणातील अनेक मंदिरांमध्ये, जांभ्या दगडाच्या ५ ते ७-८ इतक्या दीपमाळा बांधलेल्या दिसतात, तर काही ठिकाणी अशा जांभ्या दगडांच्या आणि काळ्या पाषाणात कोरलेल्या दीपमाळा एकत्रच आढळतात. कोल्हापूर, जेजुरी अशा तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणीसुद्धा एकाहून अधिक संख्येने दीपमाळा उभारलेल्या दिसतात. अनेक दीपमाळा नवस फेडण्यासाठीही बांधल्या जातात. महाराष्ट्रात अन्य अनेक ठिकाणी मुंबईतील सूतगिरण्यांच्या धुराड्यांप्रमाणे / चिमण्यांप्रमाणे सरळसोट; पण निमुळते खांब आणि त्याला अत्यंत साध्या अशा दिवे ठेवण्याच्या जागा पहायला मिळतात.

२. चासकमान (जिल्हा पुणे) येथील श्री सोमेश्वर मंदिरातील देखणी दीपमाळ
पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरजवळ चासकमान येथील श्री सोमेश्वर मंदिरातील २५६ दिव्यांची दीपमाळ ही अत्यंत देखणी आहे. ही संपूर्ण दीपमाळ चारही बाजूच्या भिंतीतील कोनाडे आणि गावातील नदीकाठावरील शेकडो कोनाडे प्रतिवर्षी त्रिपुरारि पौर्णिमेला दिव्यांनी उजळलेले पहायला प्रत्यक्ष श्री सोमेश्वर नक्कीच अवतरत असेल !
३. म्हार्दोळ (गोवा) येथील श्री म्हालसा नारायणी मंदिरात होणारा आगळावेगळा दीपोत्सव !
गोव्यातील म्हार्दोळ येथील श्री म्हालसा नारायणीच्या मंदिराचे एक खास वैशिष्ट्य आहे. येथे अनुमाने ३ मजली उंच आणि संपूर्ण पितळेची अत्यंत सुंदर दीपमाळ आहे. त्रिपुरारि पौर्णिमेला ती संपूर्ण दीपमाळ उजळली जाते. दीपमाळेतील प्रत्येक पाळीतील प्रत्येक दिव्यात वात घालून तेल घातले जाते. प्रचंड शिड्यांच्या आधारे वर चढून प्रत्येक दिवा उजळला जातो. याखेरीज देवळाच्या प्रांगणामध्ये सहस्रो दिवे उजळले जातात. आजूबाजूला विद्युत् दिव्यांचा आक्रस्ताळा झगमगाट नसल्यामुळे हे सर्व दृश्य अक्षरशः डोळ्यांचे पारणे फेडणारे असते.
४. रेणापूर (जिल्हा लातूर) आणि राशीन (जिल्हा अहिल्यानगर) येथील देवीच्या मंदिरातील हलणार्या दीपमाळा
लातूरच्या रेणापूर येथील श्री रेणुकामाता मंदिराची दीपमाळ जर हलवली, तर हलतांना पहायला मिळते. अहिल्यानगर जिल्ह्यातील राशीन या गावामध्ये असलेल्या श्री भवानी मंदिरातील दीपमाळासुद्धा अशाच हलतात. दीपमाळांच्या जगतातील हे एक वैशिष्ट्यच म्हणायचे !
विष्णु प्रबोधोत्सवाच्या निमित्ताने देवाला जागवण्यापेक्षा आपण जागृत होणे महत्त्वाचे !
– श्री. मकरंद करंदीकर, ठाणे






दिव्यांच्या छायाचित्रांचे संग्राहक : श्री. मकरंद करंदीकर
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !