गोव्यातील खाजन भूमीचे सुपीक भूमीत रूपांतर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना आवश्यक !

जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांचे वक्तव्य

सुभाष शिरोडकर

पणजी, २ नोव्हेंबर (वार्ता.) – गोव्यामध्ये अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी खाजन भूमीचे सुपीक भूमीत रूपांतर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे वक्तव्य जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले. जुने गोवे येथील भारतीय कृषी संशोधन परिषद (इंडियन कौन्सिल ऑफ अग्रीकल्चरल रिसर्च) या संस्थेमध्ये आयोजित ‘खाजन परिसंस्था पुनर्संचयित करण्यासाठी अत्याधुनिक दृष्टीकोनांवरील जागतिक प्रयत्न’ या संकल्पेनवर आधारित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोपाच्या समारंभात ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, ‘‘पुढील १० ते २० वर्षांत पाणी आणि माती यांच्या वाढलेल्या खारटपणामुळे गोवा आपल्या शेतभूमीचा मोठा भाग गमावू शकेल. राज्यात सुपीक भूमीचे रक्षण करण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची वेळ आली आहे. पाणी आणि माती यांच्या खारटपणामुळे निर्माण झालेल्या धोक्यांना तोंड देण्यासाठी ही परिषद आयोजित केल्याविषयी मी भारतीय कृषी संशोधन परिषदेचे कौतुक करतो. याविषयीच्या वैज्ञानिक संशोधनातून शेतकर्‍यांना लाभ झाला पाहिजे.’’

२९ ऑक्टोबरपासून चालू झालेल्या ३ दिवसांच्या परिषदेत माती आणि पाणी यांच्या खारटपणामुळे कृषी, परिसंस्था आणि अन्न सुरक्षा या क्षेत्रामध्ये वाढणार्‍या धोक्यांना तोंड देण्याविषयी चर्चा करण्यासाठी भारत, जपान, श्रीलंका, मॉरिशस, दुबई, ओमान, केनिया यांसह सार्क अन् आफ्रिकी आशियाई ग्रामीण विकास संघटना यातील जागतिक तज्ञ, संशोधक आणि धोरण आखणारे एकूण १५० सदस्य उपस्थित होते. भारतीय कृषी संशोधन परिषेदच्या अंतर्गत केंद्रीय मृदा क्षारता संस्था आणि केंद्रीय किनारपट्टी कृषी संशोधन संस्था यांनी संयुक्तपणे या परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत नवी देहली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेचे डॉ. ए. वेलमुरुगन, मृदा आणि पीक व्यवस्थापन प्रमुख डॉ. ए.के. राय आणि केंद्रीय मृदा क्षारता संस्थेचे डॉ. आर्.के. यादव यांनी या परिषदेत त्यांचे विचार मांडले. त्याचप्रमाणे गोवा येथील भारतीय कृषी संशोधन परिषद संस्थेचे संचालक, डॉ. प्रवीण कुमार यांनी त्यांच्या वैज्ञानिक हस्तक्षेपांद्वारे आणि प्रदेशातील मातीच्या खारटपणाचा सामना करून गोव्यातील पीक वाढवण्यात संस्थेच्या भूमिकेविषयी तपशीलवार माहिती दिली.