लोटे (जिल्हा रत्नागिरी) येथे विनयभंग केल्याच्या आरोपाप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा नोंद

डावीकडे ह.भ.प. भगवान महाराज कोकरे

रत्नागिरी – जिल्ह्यातील लोटे येथील ‘आध्यात्मिक वारकरी निवासी गुरुकुल’ येथे एका अल्पवयीन मुलीच्या विनयभंग केल्याच्या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात ह.भ.प. भगवान महाराज कोकरे आणि त्यांचे सहकारी प्रीतेश प्रभाकर कदम यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ‘पीडित मुलगी मागील काही काळापासून गुरुकुलात आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी रहात होती. या वेळी भगवान महाराज कोकरे यांनी तिच्याशी अश्लील वर्तन केले. तिच्या मनात लज्जा निर्माण होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर पीडितेने गुरुकुलातीलच एका सदस्याला ही माहिती दिली असता त्याने ‘याविषयी कुठे काही बोलू नकोस. महाराजांची सामाजिक आणि राजकीय ओळख आहे. जर कुणाला काही सांगितले, तर कुटुंबात आणि समाजात तुझीच अपकीर्ती होईल’, असे सांगितल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे.

सौ. कोकरे यांचा खुलासा

गोशाळा हटवण्यासाठीच महाराजांना फसवण्याचे कारस्थान !

गेली १७ वर्षे आम्ही येथील गोशाळा चालवत आहोत. गोशाळा बंद करण्यासाठी अनेकांनी, तसेच राजकीय लोकांनीही पुष्कळ प्रयत्न केले. आम्ही या सर्वांना खंबीरपणे तोंड देऊन येथे उभे राहिलो. आता गोशाळा हटवू शकत नाही, हे लक्षात आल्याने महाराजांनाच हटवण्यासाठी आणि त्यांचे खच्चीकरण करण्यासाठी त्यांच्यावर विनयभंगाचा आरोप करण्यात आला आहे, असे वक्तव्य ह.भ.प. भगवान महाराज यांच्या पत्नी सौ. कोकरे यांनी केले. ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांच्यावर विनयभंगाचा आरोपप्रकरणी त्या बोलत होत्या. सौ. कोकरे पुढे म्हणाल्या की, गेल्या वर्षीपासून आम्ही येथेच मुलांना आध्यात्मिक शिक्षण मिळण्यासाठी गुरुकुल चालू केले. ६ महिने येथे सर्व व्यवस्थित चालू होते; पण अचानक असे काय घडले ? कुणीतरी महाराजांविरूद्ध हे षड्यंत्र रचले. महाराजांचे खच्चीकरण झाले की, गोशाळाही हटवली जाईल. हे षड्यंत्र असून महाराजांना यात फसवण्यात आले आहे. या प्रकरणात काहीही तथ्य नाही. ती मुलगी पुष्कळ चांगली आहे. वाटल्यास तुम्ही सर्व मुलांची चौकशी करू शकता. असा कुठलाही प्रकार येथे झालेला नाही. महाराजांना फसवण्याचे हे कारस्थान आहे. पूर्णपणे राजकारण चालू आहे.