धर्मासाठी माझ्यावर कितीही गुन्हे नोंद झाले, तरी त्याची पर्वा मी बाळगत नाही ! – सौ. उज्ज्वला गौड, भाजप

सौ. उज्ज्वला गौड, भाजप

पुणे – भाजपच्या सौ. उज्ज्वला गौड यांच्या नेतृत्वाखाली समस्त हिंदु आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिवसभरात पुणे शहरातील विविध चित्रपटगृहांत जाऊन ‘मना’चे श्लोक’ या चित्रपटाचे खेळ बंद पाडले. या प्रकरणी सौ. उज्ज्वला गौड यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. काही दिवसांपासून या चित्रपटावरून निर्माण झालेल्या वादाला सौ. उज्ज्वला गौड यांनी उत्तर देतांना सांगितले की, ‘मनाचे श्लोक’ हे नाव आल्याबरोबर डोळ्यापुढे उभी रहाते, ती संत समर्थ रामदासस्वामी यांची प्रतिमा ! हे सर्व माहिती असूनही केवळ हिंदूंच्या भावनांशी खेळणे, त्यांच्या देवी-देवतांचा अपमान करणे, हे वारंवार आपल्या समाजामध्ये घडत आहे. हिंदुत्वनिष्ठांना डिवचण्यासाठी हे चालू आहे कि काय असे आता वाटत आहे. समर्थ रामदासस्वामींचे हे वांड्मय इतके पवित्र आहे की, यामुळे अनेक संसार तरले आहेत. असे असतांना जाणूनबुजून ‘मनाचे श्लोक’ हे शीर्षक ठेवत आहात आणि त्यामध्ये ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ (विवाह न करता एकत्र रहाणे), अनैतिक संबंधांसारख्या गोष्टी दाखवत आहात. माझ्यावर जो गुन्हा नोंद झाला आहे, त्या गुन्ह्याचे मी सहर्ष स्वागत करते. धर्मासाठी माझ्यावर कितीही गुन्हे नोंद झाले, तरी त्याची पर्वा मी बाळगत नाही, हा माझ्यासाठी समर्थांचा प्रसाद आहे, असे मी समजते. मी सर्वस्वी समर्थांना शरण आहे, ते माझ्यासाठी उत्तम मार्ग काढतील.

सौ. उज्ज्वला गौड यांनी पुढे सांगितले की,

नाव पालटण्यासाठी सर्वप्रथम त्यांच्याशी पत्रव्यवहार झाला होता, पत्रकार परिषदेतही मागणी करण्यात आली होती. तरीसुद्धा चित्रपटाच्या दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर लिहिले होते की, न्यायालयाने आम्हाला अनुमती दिलेली आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित करण्यापासून आम्हाला कुणीही थांबवू शकत नाही. त्यामुळे आम्ही पुण्यात एकूण ६ ठिकाणी या चित्रपटाचे खेळ बंद पाडले.

कोथरूड येथील सिटी प्राइड येथे खेळ बंद पाडत असतांना जो काही वाद-विवाद झाला, त्याच्यामध्ये पोलिसांनी माझ्या समवेत थोडी झटापट करण्याचा प्रयत्न केला; परंतु कोणत्याही गोष्टीला न जुमानता, परिणामांची काळजी न करता तो खेळ थांबवण्यात यश आले आहे. कुणीही येत्या काळात हा चित्रपट पाहू नये, अशी माझी कळकळीची विनंती आहे.

चित्रपटाचा जो ‘ट्रेलर’ (लघु विज्ञापन) दाखवला आहे, त्याच्या शेवटच्या १० सेकंदांमध्ये मनाचे श्लोकाची चाल दिली आहे आणि चित्रपटांमध्येही अनेक ठिकाणी मनाच्या श्लोकाची जी चाल आहे, त्याला वाईट शब्दांमध्ये घेण्यात आले आहे. हे सर्व आता सहन केले जाणार नाही.