Indian National Captured In Ukraine : रशियासाठी लढणार्‍या मुसलमान भारतीय विद्यार्थ्याची युक्रेनसमोर शरणागती

अमली पदार्थाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगण्याऐवजी रशियाच्या सैन्यात झाला होता भरती !

माजोती साहिल महंमद हुसेन

मॉस्को (रशिया) – युक्रेनच्या सैन्याने एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. यात एका भारतीय तरुण बोलतांना दिसत आहे. माजोती साहिल महंमद हुसेन असे त्याचे नाव असून तो मूळचा गुजरातमधील मोरबी येथील रहाणारा आहे. तो शिक्षणासाठी रशियात गेला असता त्याला अमली पदार्थाच्या गुन्ह्याच्या प्रकरणी ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. (जगात कुठेही गेले, तरी गुन्हेगारी कृत्य करणारे भारतातील अल्पसंख्य ! – संपादक) ही शिक्षा टाळण्यासाठी त्याने रशियाच्या सैन्यात भरती होण्याचे मान्य केले. त्याला १६ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आल्यानंतर युद्धासाठी पाठवण्यात आले होते; मात्र लढतांना त्याने युक्रेनसमोर शरणागती पत्करली.

१. माजोती याने व्हिडिओमध्ये माहिती देतांना म्हटले आहे की, त्याने युक्रेनच्या सैन्यासमोर शस्त्र ठेवले आणि म्हटले, ‘मला लढायचे नाही, मला साहाय्य हवे आहे. मला रशियात परत जायचे नाही.’

२. माजोती म्हणाला की, त्याला सैन्यात भरती होण्यासाठी पैसे देण्याचे आश्वासन देण्यात आले होते; परंतु त्याला काहीही मिळाले नाही.

३. युक्रेनने रशियासाठी लढणार्‍या असंख्य परदेशी सैनिकांना बंदी बनवले आहे. रशियाने भारतासारख्या देशांतील लोकांना नोकरी किंवा शिक्षण देण्याचे आमीष दाखवून सैन्यात भरती केले. गेल्या महिन्यात भारत सरकारने ‘रशियाने भारतियांना त्याच्या सैन्यात भरती करणे थांबवावे आणि सैन्यात आधीच असलेल्या भारतीय नागरिकांना सोडावे’, अशी मागणी केली होती. (भारताची ही मागणी रशियाने अद्याप मान्य केलेली नाही, यावरून भारताने काय समजायचे ? – संपादक)

आतापर्यंत १२६ भारतीय रशियाच्या सैन्यात झाले भरती

जानेवारीमध्ये परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या वृत्तानुसार युक्रेनमध्ये रशियाच्या बाजूने लढणार्‍या १२ भारतियांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत रशियाच्या सैन्यात सहभागी झालेल्या भारतीय नागरिकांची १२६ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यांपैकी ९६ जण भारतात परतले. रशियामध्ये अजूनही १८ भारतीय नागरिक अडकल्याचे वृत्त आहे, त्यांपैकी १६ जण बेपत्ता आहेत.