म्हापसा येथे एका घरावर सशस्त्र दरोडा : ५० लाख रुपयांचा ऐवज चोरला

घटनास्थळी मुख्यमंत्र्यांची भेट

प्रतिकात्मक छायाचित्र

म्हापसा, ७ ऑक्टोबर (वार्ता. ) – गणेशपुरी, म्हापसा येथील श्री गणेश मंदिराजवळील नामवंत डॉ. महेंद्र घाणेकर यांच्या बंगल्यावर ६ ऑक्टोबरच्या उत्तररात्री ३ वाजण्याच्या सुमारास ५ जणांच्या बुरखाधारी टोळीने दरोडा घातला. या दरोडेखोरांनी कुटुंबातील सर्व सदस्यांना बांधून ठेवून दागिने, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान ऐवज मिळून ५० लाख रुपयांचा मुद्देमाल चोरला. दरोडेखोरांनी पळून जाण्यासाठी डॉ. घाणेकर यांच्या चारचाकीचा वापर केला. अनुमाने ६ मासांपूर्वी दोनापावला येथे नामवंत व्यावसायिकाच्या बंगल्यावर पडलेल्या दरोड्याची पुनरावृत्ती म्हापसा येथे झाल्याची चर्चा लोकांमध्ये आहे.

सराईत चोरट्यांनी नियोजनबद्धरित्या दरोडा घातला

डॉ. महेंद्र घाणेकर यांचे वडील डॉ. मोहन घाणेकर हे शहरातील प्रसिद्ध बालरोगतज्ञ आहेत. डॉ. महेंद्र यांची आई सौ. सुहासिनी, पत्नी सौ. अनुराधा आणि १४ वर्षांची मुलगी या वेळी बंगल्यात होते.

दरोडेखोरांनी बंगल्यात प्रवेश करण्यासाठी पाठीमागील बाजूला असलेल्या खिडकीचे गज (ग्रील्स) कापले. यामधून एका संशयिताने घरात प्रवेश करून नंतर मागील बाजूचा दरवाजा उघडून इतर दरोडेखोरांना बंगल्यात घेतले. बंगल्यात आलेल्या दरोडेखाेरांनी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना उठवून धमकावले. नंतर त्यांनी पलंगावरच्या चादरी फाडून त्याचा वापर करून सर्व सदस्यांना बांधून ठेवले. कुणीही आरडाओरड करू नये, यासाठी उशांतील कापसाचे गोळे करून तोंडात कोंबण्यात आले. दरोड्याच्या वेळी संशयितांनी कुटुंबियांना धमकावण्यासाठी धारदार शस्त्रांचा वापर केला. दरोडेखोरांच्या हातात लोखंडी दुंडकेही होते. बंगल्यातील कपाटे फोडून त्यातील दागिने चोरट्यांनी पळवले; मात्र रोख रक्कम मिळत नसल्याने दरोडेखोरांनी बंगल्यातील व्यक्तींना मारहाण करण्यास प्रारंभ केला. या वेळी घाबरून एका ज्येष्ठ महिलेने स्वत:जवळ बाळगलेली रोख रक्कम त्यांना दिली. सर्वजण हिंदीतून संभाषण करत होते आणि यामुळे ते उत्तर भारतातील असावेत, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. संशयितांनी पळून जाण्यासाठी घरातील सर्वांचेच भ्रमणभाष संच काढून घेतले आणि ते नंतर बाहेर फेकून दिले. दरोडेखोर सीसीटीव्हीतील चित्रीकरणही समवेत घेऊन गेले. यामुळे सराईत चोरट्यांनी नियोजनबद्धरित्या हा दरोडा घातला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. दरोड्याच्या पूर्वी चोरट्यांनी या भागाची रेकीसुद्धा (रेकी म्हणजे काही दिवस आधी त्या भागात फिरून पहाणी करणे) केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. सर्व दरोडेखोर ३५ ते ४० वर्षे वयोगटातील होते.

दरोडेखोर बेळगावच्या दिशेने गेले

दरोडेखोरांनी पळून जाण्यासाठी डॉक्टरांची वापरलेली चारचाकी नंतर पणजी येथे पुलाखाली सापडली. तेथून ते टॅक्सी करून पहाटेच बेळगावला गेले. पोलिसांनी संबंधित टॅक्सीचालकाकडून आवश्यक माहिती घेतली आहे. पोलीस पथक बेळगावला मार्गस्थ झाले आहे.

चोरटे चहा प्यायले

डॉ. घाणेकर यांची ८० वर्षीय आई सुहासिनी यांना प्रतिदिन पहाटे लवकर उठून चहा पिण्याची सवय आहे. ज्या वेळी दरोडेखोर बंगल्यात आले, तेव्हा त्या चहा बनवत होत्या. दरोडेखोरांनी त्यांच्याकडून चहा मागून घेतला, तसेच शितकपाटामध्ये असलेली फळे आणि खाण्यापिण्याच्या वस्तू खाऊन टाकल्या.