पुणे विद्यापिठातील आर्थिक गैरव्यवहाराचे न्यायिक लेखापरीक्षण होणार !

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्ये वर्ष २०१७ ते २०२४ या काळात झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराचे न्यायिक लेखापरीक्षण करण्याची मागणी अधिसभेमध्ये सदस्यांनी केली. यावर या लेखापरीक्षणाचा अहवाल ३१ मार्च २०२६ पर्यंत समोर येईल, असा निर्णय विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांनी अधिसभेत घोषित केला.

विद्यापिठाची अधिसभा चालू झाल्यावर कुलगुरूंनी अहवालाचे वाचन केले. या अहवालावर चर्चा झाली. या चर्चेच्या वेळी विद्यापिठात गेल्या ७ वर्षांमध्ये आर्थिक अपव्यवहार झाल्याचा आरोप अधिसभा सदस्य विनायक आंबेकर यांनी केला. (‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ असलेल्या विद्यापिठाची ही अवस्था असेल, तर इतर ठिकाणच्या शैक्षणिक संस्थांची कल्पना न केलेलीच बरी. शिक्षण क्षेत्रामध्येच भ्रष्टाचार होत असेल, तर विद्यार्थ्यांवर काय संस्कार होणार ? – संपादक) या कालावधीत विद्यापिठाने जे हिशोब सादर केले, ते बेकायदेशीर आणि शंकास्पद आहेत असेही त्यांनी सांगितले. अधिसभा सदस्यांनी समिती न नेमता न्यायिक लेखापरीक्षण करावे, ही मागणी लावून धरली. त्यामुळे अखेर व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांची चर्चा करून डॉ. गोसावी यांनी आर्थिक अपव्यवहाराचे न्यायिक लेखापरीक्षण करण्यात येईल, असे जाहीर केले. आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, तसेच राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान यांच्याद्वारे दिलेल्या निधीमध्येही भ्रष्टाचार झाला आहे.